राजसाहेबांना अटक झाली तर पुण्यात जो काही तमाशा होईल त्याला महाराष्ट्र सरकार जबाबदार – बाबर

पुणे – औरंगाबाद येथील जाहीर सभेत पोलिसांनी घालून दिलेल्या १६ अटींपैकी १२ अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस ठाण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांच्यासह आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय औरंगाबादमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडल्यानंतर आता मुंबई पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना नोटीसा बजावण्यास सुरुवात केली आहे.

सभेनंतर राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी विविध स्तरांतून होत होती. अशातच औरंगाबाद पोलिसांनी राज ठाकरे यांच्या सभेची टेप ऐकून राज ठाकरे यांच्या सभेत किती नियम पाळले आणि किती टाळले याचा आढावा घेतला. त्यानंतरच औरंगाबादमधील राज ठाकरे यांच्या सभेत पोलिसांनी घालून दिलेल्या अटींचं उल्लंघन झाल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या बाजूला राज ठाकरे हे तारखेला हजर राहिले नसल्यामुळे त्यांच्या विरोधात शिराळा न्यायालयाने वॉरंट (Warrant by Shirala court) काढलं आहे. 2008 साली रेल्वे भरतीत (Railway recruitment) स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य द्या या मागणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनात कल्याण न्यायालयाच्या (Kalyan Court) आदेशाने राज ठाकरेवर अटकेची कारवाई झाली होती. या अटकेच्या निषेधार्थ शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी (Shedgevadi) गावात मनसे कार्यकर्त्यांनी बंद पुकारला आणि जबरदस्तीने दुकाने बंद करण्यास दुकानदाराना भाग पाडले. बंद पुकारल्यामुळे शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांना अटक केली जाईल अशी शक्यता वर्तविण्यात येत असताना पुण्यातील मनसेचे नेते साईनाथ बाबर यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली असून राजसाहेबांना अटक झाली तर पुण्यात जो काही तमाशा होईल त्याला महाराष्ट्र सरकार जबाबदार असेल यांची नोंद सरकारने घ्यावी…! असा इशारा दिला आहे. आता सरकार यावर काय भूमिका घेणार हे लवकरच स्पष्ट होईल.