या प्रकरणाशी माझा संबंध नाही; शरद पवारांनी फेटाळले फडणविसांचे आरोप 

मुंबई :  महाविकास आघाडीचे अनेक नेते एका सरकारी वकिलाच्या माध्यमातून भाजपाच्या अनेक नेत्यांचा सूड उगविण्याचे कसे षडयंत्र रचत आहेत, साक्षीदारापासून ते पुराव्यांपर्यंत सारे कसे मॅनेज केले जाते आहे, याचा संपूर्ण लेखाजोखाच माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत एका स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून सादर केला.

हा महाविकास आघाडीचा महाकत्तलखाना असल्याचे आणि सरकारी वकील अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांच्यामार्फत अनेक महानायक हा खेळ खेळत असल्याचा अतिशय गंभीर, स्फोटक आरोप पुराव्यांसह केला. सुमारे 125 तासांच्या या स्टिंगमधील महत्त्वाचा भाग 29 वेगवेगळ्या पेनड्राईव्हच्या माध्यमांतून त्यांनी सादर केला. भाजपा नेते गिरीश महाजन यांच्याविरोधात खोटे कुंभाड रचून एकूण 28 लोकांवर कसा एफआयआर दाखल करण्यात आला, याचा संपूर्ण लेखाजोखा त्यात आहे. शिवाय, पडद्याआडून कोण कोण मोठे नेते कसे खेळ करीत आहेत, हेही या स्टिंग ऑपरेशनमधून पुरते स्पष्ट होते आहे.

दरम्यान, फडणवीस यांच्या या आक्रमणामुळे सत्ताधारी गोंधळून गेले असून या आरोपांना नेमके उत्तर कसे द्यायचे हेच समजत नसल्याचे चित्र आहे. एकंदरीतच सरकारची चांगलीच नाचक्की झाल्याचे पाहायला मिळत असतानामहाजन यांना मोक्कामध्ये अडकवण्यासाठी सरकारी वकील षडयंत्रं रचत होता. संबंधित व्यक्तींशी संवाद साधत होता. त्यावेळी मोठे साहेब म्हणून एका मोठ्या नेत्याचं नावही घेत होता. हे मोठे साहेब कोण? हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांनी स्पष्ट केलं. या व्हिडीओमध्ये मोठे साहेब म्हणून माझा उल्लेख केला आहे. पण या प्रकरणाशी माझा अर्थाअर्थी संबंध नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच शक्तीशाली यंत्रणेशिवाय 125 तासांचं रेकॉर्डिंग होऊच शकत नाही आणि ही यंत्रणा केवळ केंद्र सरकारकडेच आहे, असं शरद पवार म्हणाले .