पहिला ट्रेंड आला, द्रौपदी मुर्मू आघाडीवर; जाणून घ्या यशवंत सिन्हा यांची काय आहे स्थिती

नवी दिल्ली- राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या मतमोजणीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi murmu)आघाडीवर आहेत. राज्यसभेचे महासचिव पीसी मोदी यांनी सांगितले की, खासदारांच्या मतांची मोजणी झाली आहे. द्रौपदी मुर्मू यांना 540 खासदारांनी मतदान केले ज्यांचे मूल्य 378000 आहे. यशवंत सिन्हा यांना 208 खासदारांची मते मिळाली ज्यांचे मूल्य 145600 आहे. एकूण 748 मते पडली असून त्यांची मूल्य 523600 आहे.

राज्यसभेचे महासचिव पीसी मोदी यांनी सांगितले की, एकूण 15 मते अवैध ठरली. हे संसदेचे (मतांचे) आकडे आहेत. देशाचे १५ वे राष्ट्रपती निवडण्यासाठी १८ जुलै रोजी ३१ ठिकाणी मतदान झाले. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत 776 खासदार आणि 4,033 निवडून आलेल्या आमदारांसह एकूण 4,809 मतदार मतदानासाठी पात्र होते. नामनिर्देशित खासदार आणि आमदार आणि विधान परिषदेचे सदस्य यामध्ये मतदान करू शकत नाहीत. नव्या राष्ट्रपतींचा शपथविधी 25 जुलै रोजी होणार आहे.

राष्ट्रपतीपदासाठी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि विरोधकांचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांच्यात लढत आहे. जर द्रौपदी मुर्मू या निवडणुका जिंकल्या आणि राष्ट्रपती बनल्या तर या सर्वोच्च पदावर पोहोचणाऱ्या त्या स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या पहिल्या नेत्या असतील. यासोबतच त्या देशाच्या पहिल्या आदिवासी आणि सर्वात तरुण राष्ट्रपती बनणार आहेत.