वाहन चालकाचा मुलगा ते हिमाचल प्रदेशचा मुख्यमंत्री, वाचा सुखविंदर सुक्खू यांच्याबद्दल

काँग्रेस नेते सुखविंदर सिंग सुक्खू (Sukhwinder Singh Sukhu) यांनी आज (दि. ११ डिसेंबर) हिमाचल प्रदेशचे सातवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी-वड्रा यांच्यासह पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि पक्षाच्या राजकीय युनिटच्या प्रमुख प्रतिभा सिंह यांची उपस्थिती होती. काँग्रेस निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख असलेले ५८ वर्षीय सुखविंदर सुक्खू यांनी प्रतिभा सिंह आणि मुकेश अग्निहोत्री यांना मागे टाकत हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्रीपद पटकावले आहे.त्यांच्यासाठी हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. एका सामान्य बस चालकाचा मुलगा ज्याने कधी स्वप्नातही विचार केला नसेल की एके दिवशी आपण राज्याचे मुख्यमंत्री बनू. याच सुखविंदर सुक्खू यांच्या वैयक्तिक आयुष्याचा आणि राजकीय प्रवासाचा थोडक्यात मागोवा घेऊ…

हिमाचल प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील नादौन तहसीलमधील सेरा गावात २६ मार्च १९६४ रोजी सुखविंदर सुक्खू यांचा जन्म झाला. एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या सुखविंदर यांचे वडील रसील सिंग हे हिमाचल रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन, शिमला येथे वाहनचालक होते. सुखविंदर यांची आई संसार देवी गृहिणी आहेत. ते त्यांच्या चार भावंडांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांचा मोठा भाऊ राजीव लष्करातून निवृत्त झाला आहे. त्यांच्या दोन लहान बहिणींचे लग्न झाले आहे.

सुखविंदर यांनी सुरुवातीच्या अभ्यासापासून एलएलबीपर्यंतचे शिक्षण हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथे घेतले आहे. ११ जून १९९८ रोजी सुखविंदर यांचा विवाह कमलेश ठाकूरसोबत झाला होता. त्यांना दोन मुली असून त्या दिल्ली विद्यापीठात शिकत आहेत.

सुखविंदर यांनी काँग्रेस एनएसयूआय या विद्यार्थी संघटनेतून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. येथे त्यांची शिमला येथील संजौली महाविद्यालयात वर्ग प्रतिनिधी आणि विद्यार्थी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस म्हणून निवड झाली होती. यानंतर त्यांची संजौली येथील शासकीय महाविद्यालयात विद्यार्थी मध्यवर्ती संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली. येथे त्यांनी तरुण विद्यार्थ्यांमध्ये आपला दबदबा निर्माण केला. त्यानंतर ते हळूहळू एक मजबूत युवा नेता म्हणून उदयास आले.

सुखविंदर यांनी १९८८ मध्ये NSUI च्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर १९९५ मध्ये त्यांना युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदाची सूत्रे मिळाली. ही त्यांच्या खांद्याव आलेली मोठी जबाबदारी होती. सुखविंदर यांनी युवा नेता म्हणून आपली पकड इतकी मजबूत केली होती की १९९८ ते २००८ पर्यंत ते सलग दहा वर्षे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. आपल्या राजकीय कारकिर्दीत ते दोनदा शिमला महापालिकेचे नगरसेवकही झाले.

पण त्यांचे ध्येय मोठे होते. म्हणून २००३ मध्ये त्यांनी पहिली विधानसभा निवडणूक लढवली आणि ते पहिल्यांदा हिमाचल प्रदेश विधानसभेत पोहोचले. त्यानंतर ते चार वेळा २००७, २०१८ आणि आता २०२२मध्ये नादौन विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले. यादरम्यान, २००८ मध्ये ते प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीसही होते. २०२२च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी, कॉंग्रेसने त्यांना एप्रिल २०२२मध्ये हिमाचल प्रदेश कॉंग्रेस निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष आणि तिकीट वितरण समितीचे सदस्य बनवून मोठी जबाबदारी दिली होती.