रथ तोडफोड प्रकरण : गुंडांना हाताशी धरुन भाजपचं पोल खोल अभियान दाबण्याचा प्रयत्न; दरेकरांचा आरोप

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण चांगलेच तापले असल्याचे दिसत आहे. सत्ताधारी आणि विरोधक हे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असताना आज एक संतापजनक घटना समोर आली आहे. मुंबईतील भाजपच्या पोल खोल रथाची तोडफोड केली असल्याचा  प्रकार समोर आला आहे.

मुंबई महापालिकेतील ( BMC) भ्रष्टाचाराची ( Corruption) पोल खोल करण्यासाठी आज भाजपने (BJP) आज एका सभेचं आयोजन केलं आहे. कांदिवली पूर्वमध्ये रेल्वे स्टेशनच्या समोर आज संध्याकाळी सात वाजता ही सभा होणार आहे. मात्र तत्पूर्वीच भाजपच्या रथाची तोडफोड( Vandalism) करण्यात आली आहे.

दरम्यान, पोलखोल होऊ लागल्याने आता सेनेच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे का ? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे. यातच आता संध्याकाळपर्यंत आरोपींना अटक केली नाही तर पोलिसांना घेराव घालू असा इशारा प्रविण दरेकर यांनी दिला. गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरुन भाजपची पोल खोल अभियान दाबण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा आरोप दरेकर यांनी केला.  यावेळी रथाच्या तोडफोडीमागे शिवसेनेचा (Shivsena) हात असल्याचा संशय प्रविण दरेकर यांनी व्यक्त केला.

या रथाच्या तोडफोड प्रकरणी तक्रार करण्यासाठी प्रविण दरेकर यांनी चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये ( Chembur police station) गेले. आरोपीला पकडलं नाही तर पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडू. यावेळी कायदा सुव्यवस्था बिघडली तर यासाठी सरकार पूर्णपणे जबाबदार असेल, असा इशारा त्यांनी दिला.