या सरकारच्या काळात आरोग्य यंत्रणाच व्हेंटीलेटरवर, सत्ताधाऱ्यांना झोप तरी कशी लागते? जयंत पाटलांची टीका

Jayant Patil :- राज्यातील शासकीय रुग्णालयात सध्या मृत्यूतांडव सुरू आहे. आधी नांदेड, नंतर छत्रपती संभाजी महाराज नगर… आता नागपुरातील वैद्यकीय महाविद्यालय आणि इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालयातील रुग्णालयात गेल्या दोन दिवसात २५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे.

या सरकारच्या काळात आरोग्य यंत्रणाच व्हेंटीलेटरवर पोहोचली आहे असे म्हणाले. प्रशासनातील गैरव्यवहार, औषधांचा अपुरा साठा, डॉक्टर्स आणि इतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे अशा अनेक बाजू पुढे आल्या आहेत. त्यावर गांभीर्याने काम करण्याची सरकारला गरज आहे. अधिष्ठात्यांना शौचालय धुवायला लावणे ही बालिश कृती करून गोष्टी सुरळीत होणार नाहीत. कारण इथे प्रश्न लोकांच्या जीवाचा आहे.

सरकारच्या भोंगळ कारभारावर हल्ला चढवताना ते म्हणाले की, दुर्दैवाने निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान  असे ब्रिद वाक्य वापरणारे, या गंभीर परिस्थितीत ढिम्म बसले आहेत. सत्ताधाऱ्यांची शांतता ही चीड आणणारी आहे. राज्यात ही परिस्थिती असताना सत्ताधाऱ्यांना झोप तरी कशी लागते हा खरा सवाल आहे.