३ तारखेलाही दोन गाड्या विनायक मेटेंच्या गाडीचा पाठलाग करत होत्या? अपघातामागचं गूढ वाढलं

Mumbai – शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete Death) यांचं नुकतेच पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर अपघाती निधन झालं. दरम्यान, आता विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूवर पत्नी ज्योती मेटे यांच्यासह अनेकांनी संशय व्यक्त केला आहे. यातच आता आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे.

शिवसंग्रामच्या (Shivsangram) बीडच्या पदाधिकाऱ्यांनी नवा खुलासा केला आहे. याआधीही त्यांच्यासोबत घातपाताचा प्रयत्न करणयात आला होता, असं शिवसंग्रामचे नेते अण्णासाहेब वायकर यांनी सांगितलं. तीन ऑगस्टला बीडहून पुण्याला जात असताना शिक्रापुरच्या आसपास दोन गाड्यांनी पाठलाग केल्याचा दावा त्यांनी केल्याने या प्रकरणात नवे वळण येण्याची शक्यता आहे.

ते म्हणाले, जेव्हा आयशर गाडीने हा पाठलाग केला. तेव्हा मी त्यांच्यासोबत होतो. तेव्हा ही गाडी आपला वारंवार पाठलाग करत असल्याचं मी मेटेसाहेबांना सांगितलं. पण ड्रायव्हर नशेत असेल म्हणून तो वारंवार पाठलाग करत असेल, असं ते म्हणाले. त्यामुळे आम्ही शांत बसलो. पण आता जो अपघात झाला त्यातही जर आयशर गाडी असेल आणि तीन तारखेला पाठलाग केलेलीच गाडी असेल, तर हा घातपात आहे,आम्ही शांत बसणार नाही, असंही ते म्हणालेत.