हिमोग्लोबिनची कमतरता जाणवते ? अवश्य खा गुळपापडीचे लाडू

पुणे : थंडीच्या दिवसात शरीराला पौष्टिक असे अन्नपदार्थ मिळावेत यासाठी तुम्ही नक्की वेगवेगळे पदार्थ घरी बनवत असाल . पण तुपाची बेरी आणि कणकेचे लाडू जर तुम्ही बनवून ठेवलेत तर आठ ते पंधरा दिवस ते छान टिकतात . तसेच हीमोग्लोबिन वाढीसाठी हे लाडू अत्यंत पौष्टिक आहेत. गरोदर मातांनी या लाडूचे अवश्य सेवन करावे . तुपाची बेरी आणि कणकेचे (गव्हाचे पीठ) लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य :  तुपाची बेरी , कणिक (गव्हाचे पीठ), तूप , दूध किंवा दुधाची साय , गुळ पावडर , ओला खजूर , ड्रायफ्रूट पावडर .

कृती  : कणकेचे लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम कणिक (गव्हाचे पीठ ) दोन मोठी वाटी तुपावर हलका तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्या . तूप कढवतना मागे राहणारी बेरी यामध्ये मिक्स करा , तूप कढवल्यानंतर लगेचच हे लाडू करून ठेवले तर अधिक चांगले, जिन्नस हलके गरम असताना हे लाडू अधिक चांगले वळले जाऊ शकतात . त्यानंतर यामध्ये गुळ पावडर किंवा किसलेला गूळ घालावा .

त्यानंतर खजूर मिक्सरमधून बारीक करून घ्यावेत . दोन वाटी कणिक घेतली असल्यास अर्धी वाटी बेरी , सात ते आठ खजूर , एक वाटी गुळ असे प्रमाण ठेवावे . त्यानंतर यामध्ये ड्रायफ्रूटचे तुकडे किंवा लहान मुलांना जर हे लाडू द्यायचे असतील तर ड्रायफ्रूटची पावडर यामध्ये घालावी यानंतर दुधाची साय किंवा दुधाचा शिपका यावर मारून हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करुन घ्यावे. गरज पडल्यास दूध किंवा तुपाच्या हाताने छोटे छोटे लाडू वळून घ्यावेत .