‘शिंदे-फडणवीस सरकारने राज्यात विश्वासाचे वातावरण निर्माण केले, राज्यात गुंतवणूक वाढत आहे’

मुंबई : शिंदे -फडणवीस सकरारच्या (Shinde-Fadnavis Government) सत्तेवर आल्यानंतर सरकारने समाजहिताचेच निर्णय घेतले. राज्यशकटाला गती देण्याचे काम केले. राज्यात विश्वासाचे वातावरण निर्माण केले. परिणामी राज्यात गुंतवणूक वाढत आहे. रोजगाराच्या अनेक संधी यानिमित्ताने उपलब्ध होत आहेत. राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांच्या अभिभाषणातून शिंदे-फडणवीस सरकारची दिशा काय?, हेच स्पष्ट झाले असल्याचे प्रतिपादन भाजप नेते आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी केले. राज्यपाल बैस यांच्या अभिभाषणाला समर्थन आणि आभाराचा प्रस्ताव आ. भातखळकर यांनी सभागृहात मांडला, यावेळी ते बोलत होते.

आ. भातखळकर म्हणाले, शिंदे – फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नामांतर अनुक्रमे छत्रपती संभाजी नगर आणि धाराशिव करण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. प्रतापगडच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखानाच्या थडग्याजवळ असलेले अतिक्रम काढले. अफजलखान वधाचे दृकश्राव्य माध्यमातून चित्रीकरण दाखवण्याचा निर्णय घेतला. आग्राच्या किल्ल्यात पहिल्यांदाच शिवजयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली, यावरूनच राज्य सरकारची दिशा, ध्येय अशा अनेक उदाहणांवरून दिसून येते. पुणे जिल्ह्यात उभारण्यात येत असलेल्या शिवसृष्टीला ५० कोटींचे अनुदान देण्याचे काम या सरकारने केले. महाराष्ट्र गीताला मान्यता देण्यात आली.

या सरकारने राज्यातील नाही रे वर्गाला मदत करण्याचे धोरण स्वीकारले. सामान्य नागरिकांना दिवाळीसारख्या वर्षातील मोठ्या सणाला आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेऊ न त्याची अंमलबजावणी केली. सततच्या पावसाने नुकसानीला सामोरे जाणाऱ्या शेतकऱ्याला मदत करण्याची भूमिका घेतली. एनडीआरएफच्या निकषच्या दुप्पट मदत देण्याचा निर्णय घेतला. मागाील अडीच वर्षाच्या सरकारच्या काळात विकासाची चक्रे रुतली होती, आता त्याला गती देण्याचे काम या सरकारने केले आहे. मुंबईतील अनेक विकास प्रकल्पांना गती मिळाली आहे. सरकार सत्तेवर येताच मेट्रोची कामे वेगात सुरू झाली आहेत. उपनगरातील सुरू झालेल्या दोन्ही मेट्रोमुळे सामान्यांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी झाला आहे. सरकार सत्तेवर येताच पेट्रोल, डिझेलचे भाव कमी केले. मुंबईमध्ये हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना सुरू केला. दीड लाख कोटींचे सामंजस्य करार डावोसमध्ये करण्यात आले. राज्यातील गुंतवणुकीला चालना मिळत आहे. विश्वासाचे वातावरण तयार झाल्याने गुंतवणूकदारचा ओढा महाराष्ट्राकडे वाढला आहे. अत्यंत कमी काळात शिंदे-फडणवीस सरकारने समाजहिताचे निर्णय घेतल्याचेही आ. भातखळकर यांनी हा प्रस्ताव मांडताना सांगितले.