Raj Thackeray : राज ठाकरेंवर औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल; अटक होणार?

औरंगाबाद – औरंगाबाद येथील जाहीर सभेत पोलिसांनी घालून दिलेल्या १६ अटींपैकी १२ अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस ठाण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांच्यासह आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय औरंगाबादमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडल्यानंतर आता मुंबई पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना नोटीसा बजावण्यास सुरुवात केली आहे.

राज ठाकरे यांनी या सभेमध्ये 4 मे नंतर राज्यात मशिदीसमोर हनुमान चालीसा वाजवण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी खबरदारी म्हणून हिंदू संघटनेचे संबंधित असलेल्या कार्यकर्त्यांना नोटीस बजावली आहे.

सभेनंतर राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी विविध स्तरांतून होत होती. अशातच औरंगाबाद पोलिसांनी राज ठाकरे यांच्या सभेची टेप ऐकून राज ठाकरे यांच्या सभेत किती नियम पाळले आणि किती टाळले याचा आढावा घेतला. त्यानंतरच औरंगाबादमधील राज ठाकरे यांच्या सभेत पोलिसांनी घालून दिलेल्या अटींचं उल्लंघन झाल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.