‘नियमित पार्ट्या, सुट्ट्या, खासगी विदेश दौरे हे आता देशाला काही नवे नाही’

नवी दिल्ली – परदेश दौऱ्यावर असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा नाईट क्लबमधील व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत राहुल गांधी हे आपल्या मैत्रिणीसोबत नाइट क्लबमध्ये दिसत आहेत. नेपाळची राजधानी असणाऱ्या काठमांडूमध्ये हा नाईट क्लब आहे. हा तेथील प्रसिद्ध क्लब आहे असं सांगण्यात येत आहे. हा व्हायरल व्हिडिओ अशा वेळी आला आहे जेव्हा काँग्रेस नेतृत्वाच्या गंभीर संकटात सापडली आहे

काठमांडू पोस्टच्या वृत्तानुसार, राहुल गांधी सोमवारी दुपारी नेपाळच्या राजधानीत दाखल झाले होते. दैनिकाने म्यानमारमधील नेपाळचे माजी राजदूत भीम उदास यांचा हवाला देऊन म्हटले आहे की त्यांनी राहुल गांधींना त्यांच्या मुलीच्या लग्नाला उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले होते.उदास यांची मुलगी सुम्निमा, सीएनएनची माजी वार्ताहर, निमा मार्टिन शेर्पा यांच्याशी लग्न करत आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनीदेखील राहुल गांधींचा व्हिडीओ ट्वीट करत निशाणा साधला आहे. “नियमित पार्ट्या, सुट्ट्या, खासगी विदेश दौरे हे आता देशाला काही नवे नाही. एक नागरिक या नात्याने हा मुद्दा नाही, पण एक खासदार, एका राष्ट्रीय पक्षाचे कायमस्वरुपी मालक जे नेहमी इतरांना उपदेश देत असतात,” असं ते म्हणाले आहेत.