‘अमृत’च्या गट प्रकल्प व्याज परतावा योजनेला भगवान परशुरामांचे नाव; कर्जावरील व्याज ‘अमृत’ भरणार!

PM Narendra Modi – ‘अमृत’ (Amrut) अर्थात महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनीमार्फत राबविल्या जाणार्‍या ‘अमृत गट प्रकल्प व्याज परतावा योजने’ला भगवान परशुरामांचे नाव देत, या योजनेंतर्गत घेतलेल्या कर्जावरील व्याज ‘अमृत’ भरेल, असे जाहीर करत, राज्याचे गृहनिर्माण, मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी राज्य सरकारच्या महत्वकांक्षी ‘अमृत’ योजनेला निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही दि.१ ऑक्टोबररोजी छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या विचार-मंथन बैठकीत तसेच ‘अमृत’ योजनांच्या शुभारंभप्रसंगी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे लघुउद्योजक घडविण्याचे स्वप्नही ‘अमृत’ योजना पूर्ण करतील, असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.

‘अमृत’च्या योजना (Amrut Yojna) व भविष्यातील वाटचाल’ यावर विचारमंथन बैठक तसेच ‘अमृत’च्या योजनांचा शुभारंभ या कार्यक्रमाचे ‘अमृत’सह सहयोगी संस्था ध्रूव अ‍ॅकॅडमी व परफेक्ट स्कील्स प्रा. लि. यांच्यावतीने १ ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथील सिडको एन-७ मधील सप्तपदी मंगल कार्यालयात आयोजन करण्यात आले होते. दीपप्रज्वलन व स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमास सुरूवात झाली. याप्रसंगी ना. अतुल सावे हे बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ‘अमृत’चे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी, तर व्यासपीठावर ‘अमृत’चे मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश वाकचौरे, प्रबंधक उदय लोकापल्ली हे, तर प्रमुख उपस्थितांमध्ये ‘अमृत’च्या सहयोगी संस्थांचे प्रमुख विनोद देशपांडे, विश्वजीत देशपांडे, भूषण धर्माधिकारी, प्रतिक गाडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

याप्रसंगी ना. सावे म्हणाले, की तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प म्हणून ‘अमृत’ संस्थेची स्थापना करण्यात आली. खुल्या प्रवर्गातील परंतु आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील समाजाच्या सर्वांगिण प्रगतीसाठी संस्था काम करत आहे. मध्यंतरीच्या राजकीय घडामोडींमुळे ‘अमृत’च्या योजना राबविण्यास थोडा उशीर झाला असला तरी, या विविध योजना गावागावात पोहोचविण्याचा प्रयत्न जोमाने सुरू आहे. तसेच, ‘अमृत’च्या सर्व योजना यशस्वी करण्यासाठी राज्य सरकार ‘अमृत’च्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. देशात जास्तीत जास्त लघुउद्योग उभे करणे, व लघुउद्योजक घडविणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. अमृत संस्थेचेदेखील तेच ध्येय आहे. लघुउद्योगासाठी १५ लाखांपर्यंतच्या वैयक्तिक कर्जावर तीन वर्षांपर्यंतचे एकूण कमाल साडेचार लाख रूपयांपर्यंतचे व्याज माफ केले जाईल, त्याचप्रमाणे ५० लाखापर्यंतच्या गट कर्जावर तीन वर्षांपर्यंतचे एकूण कमाल १५ लाख रुपयांपर्यंतचे व्याज माफ केले जाईल, असे सांगून याप्रसंगी ना. सावे यांनी परशुराम गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजनेचीसुद्धा घोषणा केली. आर्थिक विकास महामंडळामध्ये ज्या दोन्ही योजना राबविल्या जातात, त्या दोन्ही योजना ‘अमृत’ राबविणार आहे, असे सांगून परशुराम आर्थिक विकास महामंडळाची मागणीच यानिमित्ताने ना. सावे यांनी आपोआप निकालात काढली. तसेच, ‘अमृत’च्या सर्व योजना यशस्वी करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून, ‘अमृत’ला आणखी निधी देऊ, असेही त्यांनी याप्रसंगी जाहीर केले. त्याचे सर्व उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.

याप्रसंगी ‘अमृत’चे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी ‘अमृत’च्या विविध योजनांचे सादरीकरण केले. याप्रसंगी ते म्हणाले, की तरुणांना नोकर्‍या नाहीत म्हणून त्यांची लग्ने होत नाहीत, ही आजच्या युवापिढीसमोरील मोठी समस्या आहे. ‘अमृत’ या युवापिढीला कौशल्यविकास व प्रशिक्षणांद्वारे नोकरीक्षम बनवून नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. ८ ते १० हजार युवक-युवतींना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य ‘अमृत’ने पुढील काळात निश्चित केलेले आहे. समाजाच्या आर्थिक दुर्बलतेचा शोध घेऊन, ही आर्थिक दुर्बलता दूर करण्यासाठी ‘अमृत’ कटिबद्ध आहे. ‘अमृत’ ही केवळ शासकीय योजना किंवा संस्था नाही तर ती लोकचळवळ आहे, या लोकचळवळीत आपण सर्व आपआपल्या परीने सहभागी व्हावे, असे आवाहनही विजय जोशी यांनी केले.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला रोजगार व नोकरीच्या संधी या अनुषंगाने परफेक्ट स्कील्स प्रा. लि. या ‘अमृत’च्या सहयोगी संस्थेचे अध्यक्ष प्रतिक गाडे यांनी सादरीकरण करत, उपस्थितांना मार्गदर्शन केले. ‘अमृत’च्या योजना-प्रशिक्षण आणि संधी यातून नोकरी व रोजगाराच्या संधी याबाबत त्यांनी सविस्तरपणे मार्गदर्शन केले. तर, स्वयंरोजगार- लघु उद्योग व उद्योजकता विकास यावर ध्रूव अ‍ॅकॅडमी, पुणे या ‘अमृत’च्या सहयोगी संस्थेचे अध्यक्ष विनोद देशपांडे यांनी सादरीकरण देत, मार्गदर्शन केले. स्वयंरोजगाराच्या माध्यमातून ‘अमृत’ला उद्योजक घडवायचे आहेत. ‘अमृत’ची टीम प्रत्येक गावागावात पोहोचून योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवेल, असेही ते याप्रसंगी म्हणाले. याप्रसंगी गाडे व देशपांडे यांनी उपस्थितांच्या शंकाचे निरासनदेखील केले.

याप्रसंगी सौ. विजया कुलकर्णी, अनिल मुळ्ये, मिलिंद पोहनेरकर, आरती देशपांडे, सुरेश मुळ्ये, यांच्यासह संशोधक विद्यार्थी मिनल गोस्वामी, मिलिंद पांडे यांनीही आपले विचार व्यक्त करत, ‘अमृत’कडून असलेल्या अपेक्षा मांडल्यात. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचलन करून उपस्थितांचे आभार प्रसिद्ध निवेदिका जाई वैशंपायन यांनी व्यक्त केले.

या बैठकीच्या सुरूवातीला ‘अमृत’चे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांची विविध क्षेत्रातील महिला व पुरूष मान्यवरांनी भेट घेऊन, ‘अमृत’ संस्था व ‘अमृत’च्या विविध योजनांबाबत माहिती जाणून घेतली, तसेच आपली मते त्यांच्यासमोर मांडली. शेतीपूरक उद्योग व्यवसायाला अनुकूल योजना आणाव्यात, युवकांना उद्योजक बनविणार्‍या योजना अधिक सोयीस्कर कराव्यात आदी काही सूचनांचा त्यात समावेश होता. या सर्व सूचना ऐकून याबाबत ‘अमृत’ निश्चितच आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करेल, असे श्री जोशी यांनी सांगितले. यामध्ये प्रामुख्याने परशुराम सेवा संघाचे अध्यक्ष विश्वजीत देशपांडे, अनिल मुळे, बहुभाषिक ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष सुरेश मुळ्ये, अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ, बीडचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जोशी, बहुभाषिक ब्राम्हण महासंघ संभाजीनगरचे युवा जिल्हाध्यक्ष पंकज पाठक, शाकंभरी फार्म्सच्या आरती कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार मकरंद जहागीरदार, लघुउद्योग भारतीचे प्रचारप्रमुख मिलिंद पोहनेकर, ओरिजिन मल्टिसर्विसेसचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार रेणुकादास मुळे, विराज एण्टरप्रायझेसचे विलास कौसडिकर, कविता कन्स्ट्रक्सनचे अध्यक्ष शंतनु सुभेदार, वैष्णवी केटरर्सचे अनिरूद्ध गावपांडे, महेश मुळ्ये, ब्राम्हण महिला मंचच्या अध्यक्षा सौ. विजया कुलकर्णी, माजी सनदी अधिकारी शशांक बर्वे, अनिरूद्ध मुळ्ये यांच्यासह संशोधक विद्यार्थी मिनल गोस्वामी, मिलिंद पांडे,माजलगाव येथील नगरसेवक. विनायक मामा रत्नपारखी आनंद कुलकर्णी बीड येथील अ‍ॅड. समीर पाटोदकर, चंद्रकांत जोशी, डॉ. प्रशांत देशपांडे आदींचा समावेश होता.

महत्वाच्या बातम्या-
रोहित पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्त महाविद्यालात होणार चक्क लावणीचा कार्यक्रम?

बाराही महिने चालणारे व्यवसाय, दर महिन्याला तगडी कमाई करुन देऊ शकतात ‘हे’ व्यवसाय

Bed Bugs: ढेकणांना त्रासलाय? ‘हे’ घरगुती उपाय करुन एका दिवसात पळवून लावा ढेकूण