राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने ‘या’ तीन धुरंधर नेत्यांवर सोपविली विशेष जबाबदारी

मुंबई – शिवसेना आणि भाजप (Shiv Sena and BJP) या दोन्ही पक्षांनी राज्यसभा निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे. (rajya-sabha-elections) राज्यसभेची सहावी जागा कोणत्याही परिस्थितीत जिंकायची असा निर्धार दोन्ही बाजूच्या नेत्यांनी व्यक्त केला असून या निवडणुकीत विरोधी पक्षाला धूळ चारण्यासाठी दोन्ही पक्षातील दिग्गज नेते व्यूहरचना करत आहेत. यातच एकमेकांवर घोडेबाजार करत असल्याचा देखील आरोप केला जात आहे.

शिवसेना आणि भाजपचे उमेदवार रिंगणात असले तरी महाविकास आघाडी सरकारची प्रतिष्ठा या निवडणुकीत लागली आहे. सहावा उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेना आणि महाविकास आघाडीला प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे.दरम्यान, आता दोन्ही बाजूने विजयाचे दावे केले जात असून या निवडणुकीत विजयाचा गुलाल आता कोण उधळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, भाजपने ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकायची असा निर्धार केला असून गिरीश महाजन,आशिष शेलार, प्रसाद लाड ( Girish Mahajan, Ashish Shelar, Prasad Lad )या नेत्यांवर महत्वाची जबाबदारी सोपविली आहे. भाजप सत्तेत असताना गिरीश महाजन यांची संकटमोचक म्हणून ओळख होती. आता हाच पत्ता राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने वापरायचा ठरवला आहे. तर गेल्यावेळी मुंबई महापालिका निवडणुकीत आशिष शेलार यांनी चमकदार कामगिरी केली होती, आता त्यांना राज्यसभेची मोहीम दिली आहे, तर निवडणुकांचं व्यवस्थापन करण्याची जबाबदारी प्रसाद लाड यांच्यावर देण्यात आली आहे. आता हे त्रिमूर्ती भाजपला विजय मिळवून देतात का? हे पाहणे महत्त्वाचे आहे.