आमदारांच्या मुंबईतील घरांसाठी माजी आमदाराने फाटके कपडे घालून मागितली भीक

कन्नड – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी नुकतीच एक मोठी घोषणा केलीय. आमदारांना मुंबईत कायमस्वरुपी घर मिळावं (Home In Mumbai) अशी मागणी विधानसभेत शिवसेना आमदारांकडून करण्यात आली होती. त्याच धर्तीवर मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे.आमदारांसाठी आता मुंबईत 300 घरं बांधणार असल्याची घोषणा (Homes For Mla) मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलीय.

दरम्यान, आमदारांना घरं देण्याच्या निर्णयावर सर्वसामान्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. सोशल मिडीयावर सरकारवर टीका होऊ लागली आहे. आमदारांची कोट्यवधींची संपत्ती आहे, सोबतच काही आमदारांकडे 7 ते 8 घरं आहेत. अशातच त्यांना घरं का? असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित करण्यात आला आहे. यातच आता कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांनी सरकारच्या या निर्णयाचा निषेध करत आज अनोखे भीक मांगो आंदोलन केले.

हर्षवर्धन जाधव यांनी दुपारी कन्नड शहरातील पिशोर नाका येथे भीक मांगो आंदोलन सुरू केले. यावेळी त्यांच्यासोबत ईशा झा या देखील होत्या. ‘हमको बंम्बई मे घर बांधणे का, हम कर नही भर सकते, राम के नाम पे, अल्ला के नाम पे एक रुपया भीक दे दो’, असे म्हणज जाधव आणि झा यांनी व्यापारी, रिक्षाचालक फळ विक्रेते यांच्याकडे भीक मागितली.