संकटमोचक संकटात : गिरीश महाजन यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता, पुणे पोलिसांची जळगावात छापेमारी

जळगाव : पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात जळगावातील  विजय पाटील (Adv.Vijay Patil) यांच्या फिर्यादीवरून दाखल गुन्ह्यात भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आज सकाळीच पुणे पोलिसांच्या (Pune Police) पथकाने जळगावात पाच ते सहा ठिकाणी छापेमारी केली आहे.

जळगावातील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या वादाप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस जळगावात दाखल झाल्याने महाजन यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गिरीश महाजन यांच्यावर मोक्काची कारवाई होणार असून त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात चौकशीसाठी रविवारी पहाटेपासून पोलिसांचे ५० जणांचे पथक जळगावात दाखल झालं आहे.

दरम्यान, या प्रकरणातील मूळ फिर्यादी विजय पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. गिरीश महाजन हे या प्रकरणातील मूळ सूत्रधार असून त्यांच्यावर मोक्काची कारवाई होईलच, असा आपल्याला विश्वास असल्याची प्रतिक्रिया विजय पाटील यांनी दिली आहे. गिरीश महाजन यांना मराठा विद्या प्रसारक संस्था हडप करायची होती मात्र त्यांना तसं न करता आल्याने त्यांनी आपल्याला त्रास दिल्याचेही विजय पाटील यांनी सांगितले.

नेमकं काय आहे प्रकरण?

जळगावातील बहुचर्चित मराठा विद्या प्रसारक संस्थेची जागा हडप करण्यासाठी भोईट गटाला मदत करून आमदार गिरीश महाजन आणि त्यांच्या समर्थकांनी आपल्याला डांबून ठेवत धमकावण्यासह खंडणी वसूल केल्याची तक्रार विजय भास्कर पाटील यांनी केली होती. या प्रकरणी त्यांनी जळगाव जिल्ह्यातील निंभोरा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा नंतर पुण्यातील कोथरूड पोलीस स्थानकात वर्ग करण्यात आला.