गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडमधील वादात मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या फूड डिलिव्हरी बॉयची मुलीला मारहाण

नवी दिल्ली : सार्वजनिक ठिकाणी दोन लोकांमध्ये वाद किंवा भांडण होत असेल तर तिथे लोक जमून हस्तक्षेप करणे हे सर्रास घडते. मात्र हस्तक्षेप करणारी व्यक्तीच मारहाण करू लागली तर नवलच. गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडमधील वादाचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मदतीसाठी आलेल्या फूड डिलिव्हरी बॉयने मुलीला मारहाण केल्याचं समोर आले आहे.

हे प्रकरण ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथील असून, मधल्या रस्त्यावर भांडण करणाऱ्या जोडप्याला शांत करण्यासाठी आलेल्या व्यक्तीमध्येच हाणामारी झाली. या घटनेचे काही व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यामध्ये एक मुलगी रस्त्याच्या मधोमध तिच्या प्रियकरासोबत भांडताना आणि सतत शिवीगाळ करताना दिसत आहे. रस्त्यावर गर्दी जमू लागली आहे, पण मुलगा शांतपणे ऐकत राहतो.

यादरम्यान, या भांडणाच्या वेळी तेथून जाणाऱ्या एका फूड डिलिव्हरी बॉयने मुलीला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलगी इतकी संतापली की तिने फूड डिलिव्हरी बॉयवर रागाने ओरडण्यास सुरुवात केली. ही गोष्ट त्याला सहन न झाल्याने त्याने मुलीला मारहाण केली. सुमारे तीन-चार थप्पड मारल्यानंतर तिथे उपस्थित लोकांनी त्याला थांबवण्याचाही प्रयत्न केला, मात्र तो मारतच राहिला. आता या घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे.