‘पनीर पसंदा’ची रेसिपी २०२२मध्ये गुगलवर झालीय सर्वाधिक सर्च, तुम्हीही नक्की बनवा

Google Year In Search 2022: पनीर म्हणजे प्रेम आहे. लग्न असो वा कोणता खास दिन, खाण्यामध्ये पनीर हा सर्वांच्या आवडीचा पदार्थ असतो. लोकांना पनीरचे पदार्थ फक्त खायलाच आवडत नाहीत, तर ते बनवायलाही आवडतात. यामुळेच स्नॅक्सपासून भाज्यांपर्यंत पनीरच्या पदार्थांची यादी मोठी आहे. पण या सर्वात वरती एक डिश आहे, जी 2022 मध्ये फक्त भारतातच नाही तर जगभरातील लोकांनी सर्वाधिक सर्च केली आहे. लोकांनी ही डिश गुगलवर इतकी सर्च केली की ती गुगलवर प्रसिद्ध झाली आणि पहिल्या क्रमांकावर आली आहे.

‘पनीर पसंदा’ असे या डिशचे नाव आहे. होय, पनीरच्या या डिशला जागतिक आणि भारतीय दोन्ही स्तरावर Google Top Search 2022 मध्ये सर्वोच्च स्थान मिळाले आहे. ही डिश कशी बनवायची?, त्यासाठी लागणारी सामग्री व रेसिपी याबद्दल आपण जाणून घेऊ…

‘पनीर पसंदा’साठी लागणारी सामग्री
पनीर – 250 ग्रॅम
कॉर्नफ्लोर – 2 चमचे
आले लसूण पेस्ट – 1 चमचे
बारीक चिरलेले काजू, बदाम, बेदाणे – 2 चमचे
तळण्यासाठी तेल – 200 ग्रॅम

ग्रेव्ही कशी तयार करावी?
टोमॅटो – 4 मध्यम आकाराचे
हिरवी मिरची – 4
ताजी मलई – 1 कप
तेल – 3 चमचे
आले पेस्ट – 1 चमचे
कस्तुरी मेथी – 1 चमचे
जिरे – 1 चमचे
धने पावडर – 1 चमचे
काश्मिरी लाल तिखट – 1/2 चमचे
हल्दी पावडर – 1/4 चमचे
गरम मसाला – 1/4 चमचे
मीठ – चवीनुसार

पनीर पसंदाची रेसिपी-
सर्वप्रथम पनीरचे अर्धा इंच जाडीचे त्रिकोणी तुकडे करावेत. आता पनीर स्टफ बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य चांगले मिसळा. नंतर कॉर्नफ्लोअरमध्ये थोडे पाणी घालून घट्ट पीठ बनवा. हवे असल्यास मीठ आणि थोडे चिली फ्लेक्स घाला. आता पनीरचे त्रिकोणी तुकडे मधून मधून कापून त्यात तयार साहित्य भरा. कढईत तेल गरम करा. आता पनीर सँडविच कॉर्नफ्लोअरच्या पिठात बुडवून हलका तपकिरी होईपर्यंत तळा.

पनीर सँडविच बनल्यानंतर ग्रेव्ही तयार करू. यासाठी टोमॅटो आणि हिरवी मिरची चांगली बारीक करून घ्यावी. कढईत थोडेसे तेल गरम करून घ्यावे. त्यात आलं लसूण पेस्ट, हिंग, हळद, धणे घालून मंद आचेवर हलवून घ्या. आता त्यात टोमॅटो मिरचीची पेस्ट घाला. तेल सुटेपर्यंत परतून घ्या, आता काश्मिरी मिरची आणि चवीनुसार मीठ घाला. तेल सुटल्यानंतर ग्रेव्हीमध्ये क्रीम घाला. उकळायला लागल्यावर त्यात एक कप पाणी घाला. ग्रेव्ही शिजल्यावर त्यात गरम मसाला आणि हिरवी कोथिंबीर घाला. आता तयार केलेले पनीर सँडविच ग्रेव्हीमध्ये टाका आणि दोन मिनिटे शिजल्यानंतर गॅस बंद करा. तुमचा शाही पनीर पसंदा तयार आहे.