“मला नरडं आहे त्यांना गळा”, सुषमा अंधारेंचा अमृता फडणवीस यांच्यावर खोचक शब्दांत निशाणा

मुंबई- शिवसेना ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यावर उपमुख्यमंत्री व भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी टीका केली होती. सुषमा अंधारे या मला माझ्यासारख्या वाटायच्या. मनात असेल ते स्पष्ट बोलायच्या. त्या कुणाला घाबरायच्या नाहीत. जे आहे ते स्पष्टपणे बोलायच्या. मात्र, आता त्यांना जशी स्क्रीप्ट मिळते, तशा त्या बोलतात, असा टोला अमृता फडणवीस यांनी लगावला होता. यावर सुषमा अंधारे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहीत खोचक शब्दांत निशाणा साधला आहे.

अमृता वहिनींना मी त्यांच्यासारखे वाटते असं त्या जाहीरपणे एका मुलाखती दरम्यान म्हणाल्या. मी सतत विचार करत होते की मी त्यांना कोणत्या अँगलने त्यांच्यासारखी वाटत असेल बरं? कारण दिसायला तर त्या निश्चितपणे माझ्यापेक्षा अधिक सुंदर आहेत. श्रीमंत ही आहेत. बाकी मला नरडं आहे त्यांना गळा आहे. मग काय साधर्म्य असेल आमच्यामध्ये?, असा सवाल सुषमा अंधारे यांनी पोस्टमधून केला आहे.

मग मला कधीतरी वाटलं की कदाचित भाषा प्रभुत्व हे दोघीतलं साम्य असेल का? पण छे! कालची मुलाखत आणि त्यातलं त्यांचं कॉन्टिनेन्टल उच्चारात मराठी ऐकलं अन् खात्री पटली की आमच्यात साम्य असे काहीच असु शकत नाही, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.