‘प्रिय बाबा, तुमच्या विचारांची स्वाभिमानी मशाल…’, शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सुप्रिया सुळे भावूक

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार (Sharad Pawar) आज आपला ८२वा वाढदिवस (Sharad Pawar Birthday) साजरा करत आहेत. या खासदिनी चाहत्यांपासून राजकीय नेत्यापर्यंत सर्वांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अगदी शरद पवार यांची कन्या व राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही आपल्या वडिलांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भावूक ट्वीट करत त्यांनी शरद पवारांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना केली आहे.

‘प्रिय बाबा, तुम्ही आम्हा सर्वांसाठी उर्जेचा अखंड स्रोत आहात. समाजकारण, राजकारण या क्षेत्रांसह कौटुंबिक पातळीवर देखील तुम्ही आम्हा सर्वांचे आदर्श आहात. तुमच्या विचारांची स्वाभिमानी मशाल घेऊन आम्ही सर्वजण आपल्यासोबत अविश्रांत चालण्याचा प्रयत्न करीत आहोत. बाबा, तुम्हाला निरोगी दिर्घायुष्य लाभो ही सदिच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!’, असे भावनिक ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केले आहे.