कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही गांधी हत्येचे समर्थन करू शकत नाही; अमोल कोल्हेंना आव्हाडांचा इशारा

पुणे – छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे यांच्या भूमिकेतून घराघरात आणि जनतेच्या मनात पोहोचलेले राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटावरुन आता नवा वाद सुरु झाला आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी या चित्रपटामध्ये नथुराम गोडसेची भूमिका साकारल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडूनच त्यांना विरोध होऊ लगाला आहे. हा सिनेमा महिना अखेरिस प्रदर्शित होणार आहे. मात्र, या अमोल कोल्हे यांनी साकारलेल्या या भूमिकेनंतर आता संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

दरम्यान, मंत्री  जितेंद्र आव्हाड यांनी अमोल कोल्हेंनी ही भूमिका साकारल्याचा निषेध नोंदवलाय. “अमोल कोल्हे यांच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून हे स्पष्ट होते की अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे ची भूमिका केलेली आहे. त्यांनी केलेली कृती जरी कलाकार म्हणून केली असली, तरी त्यामध्ये नथुराम गोडसेचे समर्थन आलेच आहे. कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही गांधी हत्येचे समर्थन करू शकत नाही,” अशा शब्दांमध्ये आव्हाड यांनी आपली नाराजी व्यक्त केलीय. तसेच पुढे बोलताना, “विनय आपटे, शरद पोंक्षे यांना या भूमिकेबद्दल महाराष्ट्रातील पुरोगामी जनतेने प्रचंड विरोध केला त्यामुळे त्याच भूमिकेबरोबर राहून या गांधी विरोधी चित्रपटाला विरोध करणार,” असंही आव्हाड म्हणाले आहेत.

कधी प्रदर्शित होणार हा चित्रपट?

अमोल कोल्हे यांच्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ चित्रपटाचा प्रोमो प्रदर्शित झालेला आहे. हा चित्रपट ३० जानेवारी २०२२ ला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. यावर अमोल कोल्हे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून या चित्रपटाचे शूटिंग आपण राजकारणात येण्याच्या आधीच झाले होते असे त्यांनी म्हटले आहे.

30 जानेवारी 1948 या दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची नथुराम गोडसे यांनी हत्या केली होती. दरम्यान, 30 जानेवारी या दिवसाचा धागा पकडत येत्या 30 तारखेलाच हा सिनेमाता प्रदर्शित होणार आहे. 30 जानेवारी, 2022 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांना बघायला मिळू शकेल.