छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील पात्र लाभार्थींना लवकरच अनुदान – अतुल सावे

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी (CSMSSY) नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात १ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेतील पात्र उर्वरीत लाभार्थी शेतकऱ्यांना लवकरच अनुदान मिळेल, असे सहकार मंत्री अतुल सावे (Atul Save) यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तरांच्या तासात सांगितले.

यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील १ लाख २८ हजार ४६४ शेतकऱ्यांना अद्यापही छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा (Chhatrapati Shivaji Maharaj Shetkari Sanman Yojana) लाभ मिळालेला नाही. याबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे Ambadas Danve) यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

सहकार मंत्री श्री. सावे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना तीन टप्प्यात राबविली आहे. आतापर्यंत दीड लाख कर्ज परतफेड योजना, वनटाइम सेटलमेंट आणि नियमित कर्ज परतफेड प्रोत्साहनपर ही योजना राबविली गेली आहे. या योजनेतंर्गत ज्या पात्र लाभार्थींना या योजनेचे लाभ मिळाले नाहीत त्यांना मार्च २०२३ अखेर अनुदान देण्यात येईल. नुकत्याच सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असेही मंत्री श्री. सावे यांनी सांगितले. सदस्य एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनीही यासंदर्भात उपप्रश्न उपस्थित केला.