अखेर पडद्यामागील सूत्रधार बाहेर! अमित शहांच्या कृपेमुळे हार्दिक पंड्या बनला टीम इंडियाचा कर्णधार ?

New Delhi: भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) श्रीलंकेविरुद्धच्या आगामी टी20 मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. बीसीसीआयने अलीकडेच पंड्याला टी20 संघाचा कर्णधार (Team India Captaincy) बनवले आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात 3 सामन्यांची टी20 आणि वनडे मालिका खेळली जाईल. ही मालिका 3 जानेवारी 2023 पासून सुरू होणार आहे. याआधी हार्दिकने गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली आहे, ज्याचा फोटो त्याने सोशल मीडियावर (Hardik Pandya Meets Amit Shah) शेअर केला आहे.

हार्दिक पांड्याने शनिवारी त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवर दोन फोटो शेअर केले. दोन्ही फोटोंमध्ये तो मोठा भाऊ कृणाल पंड्यासोबत अमित शहा यांना भेटताना दिसत आहे. पंड्याने या फोटोच्या कॅप्शन लिहिले की, ‘आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल आणि आमच्यासाठी मौल्यवान वेळ काढल्याबद्दल मी गृहमंत्री अमित शाहजींचा आभारी आहे. तुम्हाला भेटणे हा एक सौभाग्य आहे.’

पंड्याने शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांच्या नानाविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अधिकांनी तर त्याला अमित शहांसोबतच्या भेटीवरून ट्रोल केले आहे. एकाने कमेंट करत लिहिले आहे की, ‘अखेर पडद्यामागील सूत्रधार बाहेर आला, ज्यामुळे हार्दिक पंड्या कर्णधार झाला.’ तर काहींनी हार्दिकचे भविष्यातील भाजपा पक्षप्रवेशाचे तर्कवितर्क लावले आहेत.