डी गँगकडून घेतलेल्या पैशांचा वापर राणा दाम्पत्यानं कुठं केला? संजय राऊत यांचा थेट सवाल 

मुंबई: राणा दाम्पत्य आणि शिवसेना (Shivsena) हा वाद काही शमण्याची चिन्हं नसून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नवनीत राणा (Navneet Rana) यांनी युसूफ लकडावाला (Yusuf Lakdawala) याच्याकडून 80 लाखांचं कर्ज घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे. युसूफ लकडावाला हे नाव अंडरवर्ल्डशी (Underworld) संबंधित आहे. हा प्रश्न राष्ट्रीय सुरक्षेशी (national security) संबंधित असून ईडी (ED) आता त्याची चौकशी करणार का असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे.

मुंबईतील वातावरण बिघडवण्यामागे अंडरवर्ल्ड कनेक्शन आहे. डी गँगकडून घेतलेल्या पैशांचा वापर राणा दाम्पत्यानं कुठं केला? असा सवाल संजय राऊतांनी केला आहे. राऊत यांनी म्हटलं आहे की,  सवाल राणा दांपत्य अचानक रामभक्त, हनुमान भक्त झाले.  मुंबईत धिंगाणा घालू लागले.  वातावरण बिघडवू लागले.  मात्र त्यांचे डी गँगशी (D Gang) संबंध असल्याचं समोर येतयं.  गेल्या 15 दिवसांत जे घडतंय  त्यामागे डी गँगचा पैसा लागला आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

राऊत यांनी म्हटलं आहे की, डी गँगचा फायनान्सर लकडावालाशी राणांचे संबंध असल्याचा एक छोटासा पुरावा समोर आला आहे. हे पैसे का घेतले? हा तपासाचा भाग आहे. पण ईडी याचा तपास का करत नाही ?, हा लकडावाला आधी ईओडब्ल्यूच्याच (EOW) कस्टडीत होता. मग तो ईडीच्या ताब्यात गेला. मग याची चौकशी का झाली नाही ? असा सवाल देखील संजय राऊतांनी केला आहे.