75 वर्षांच्या व्याधिग्रस्त सोनिया गांधी यांना चौकशीसाठी बोलावून ईडीने आणि मोदी सरकारने काय साधले?

पुणे – नॅशनल हेराल्ड’ (National Herald) या वृत्तपत्राशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग (Money laundering) प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) गुरुवारी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi)यांची चौकशी केली आहे. विशेष म्हणजे सोनिया गांधी यांना पाठींबा व्यक्त करत  कॉंग्रेस नेत्यांकडून दिल्लीसह (Delhi) अनेक ठिकाणी निषेध करण्यात आला आहे.

दरम्यान, आता या मुद्द्यावरून जेष्ठ पत्रकार हेमंत देसाई (Hemant Desai) यांनी भाजपवर (BJP) टीका केली आहे. ते आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात, 75 वर्षांच्या व्याधिग्रस्त सोनिया गांधी यांना चौकशीसाठी बोलावून ईडीने आणि मोदी सरकारने (Modi Government) काय साधले? राहुल गांधींना (Rahul Gandhi) आणि नॅशनल हेराल्डशी संबंधितांना बोलावून जरूर चौकशी करा, पण सोनियाजींचे वय आणि प्रकृती लक्षात घेण्याची गरज होती. मात्र तुम्ही स्वतः देशावर राज्य करत होता ना, आता तुम्हालाही कसे वागवतो हे बघा, या प्रवृत्तीतूनच हे घडले आहे. परंतु सोनियाजी या इंदिराजींच्या सूनबाई आहेत. त्या असल्या उद्योगांना घाबरणाऱ्या नाहीत.

राहुल यांच्यावर इतर कशाही प्रकारची टीका करा, परंतु ते अत्यंत नीडर आहेत आणि प्रियांका देखील. 2014 मध्ये मोदी सत्तेवर आले, तेव्हा ‘सोनिया, राहुल, प्रियांका हे देशातून पळून जाणार आहेत’ अशा अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून पिकवण्यात आल्या. परंतु तसे घडणारच नव्हते. आपण शेवटपर्यंत याच देशात राहणार आहोत, असे सोनियाजींनी जाहीरपणे सांगितले आहे. मात्र लोकांना सतत चौकशीसाठी बोलवायचे आणि ‘ही मंडळी आरोपी आहेत’, असे जनतेच्या मनावर सतत बिंबवत राहायचे, ही सध्याची प्रचलित पद्धत आहे. ‘प्रोसेस इज द पनिशमेंट’ (Process is the Punishment) असे उद्गार सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) जुबेरच्या प्रकरणात काढून सरकारची खरडपट्टी काढली आहे. परंतु त्यापासून शहाणे व्हायचेच नाही आणि आपले विकृत राजकारण चालूच ठेवायचे, असा चंग दिल्लीतील सत्ताधाऱ्यांनी बांधलेला दिसतो. याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे! असं देसाई यांनी म्हटला आहे.