मी राजीनामा देण्यास तयार,मात्र आधी आदित्य ठाकरेंनी…; सुहास कांदे याचं थेट ठाकरेंना आव्हान 

नाशिक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केलेल्या उठवानंतर आता शिवसेनेत उभी फुट पडली आहे. दिवसेंदिवस शिवसेनेतून अनेकजण शिंदे गटात सामील होत आहेत. या पार्श्वभूमीवर उरलेली शिवसेना (Shiv Sena) वाचवण्यासाठी ठाकरे पितापुत्रांची धडपड सुरु झाली आहे. कित्येक वर्ष शिवसैनिकांना न भेटणारे ठाकरे पितापुत्र आता पक्ष हातातून जाईल या भीतीने ठिकठिकाणी मेळावे घेत असल्याचे दिसत आहे.

यातच आज शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) नाशिक (Nashik) दौऱ्यावर आहेत. मात्र आता त्यांच्या या दौऱ्यात बंडखोर आमदार सुहास कांदे (Suhas Kande) निवेदन देणार आहेत. या निवेदनाच्या माध्यामतून आदित्य ठाकरे यांना ते एकप्रकारे जाब विचारणार आहेत.दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बंडखोर आमदारांना हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरं जा असं आव्हान दिलं होतं. त्यांच्या या आव्हानाला देखील सुहास कांदे यांनी उत्तर दिलं आहे.

आम्हाला भाजपा-शिवसेना (Shivsena-BJP) युतीवर आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लोकांनी निवडून दिलं हे आदित्य ठाकरे विसरले आहेत. आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आणि हिंदुत्ववादी आहोत. उद्धव ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे मी राजीनामा देऊन पुन्हा निवडून येण्यास तयार आहे, पण त्याआधी आदित्य ठाकरेंनी माझ्या प्रश्नाची उत्तरं द्यावीत. मी राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन दाखवतो, असं सुहास कांदे म्हणाले आहेत.