ओबीसी अरक्षण मंजूर करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचा धनगर समाजाकडून होणार विशेष सन्मान

मुंबई :- राज्याच्या राजकारणात अतिशय आव्हानात्मक परिस्थितीत संघर्ष करून मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर राज्यातील धनगर समाजाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. येत्या 24 जुलै रोजी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात (Rangsarada Auditorium, Bandra) पार पडणाऱ्या या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातुन धनगर समाजाची लोकं थेट मुंबईत जमणार आहेत.

मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर तातडीने पावले टाकून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी ओबीसी आरक्षण मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. एकीकडे बाठीया आयोगाच्या डेटा मधील त्रुटी दूर करायला सांगितल्या तर दुसरीकडे दिल्लीत जाऊन या सुनावणीवेळी राज्याला दिलासा कशाप्रकारे मिळेल यासाठी देखील वकिलांशी बोलून प्रयत्न केले. त्याचीच परिणीती म्हणून सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण मंजूर केले. या प्रयत्नांबद्दल मुख्यमंत्र्यांचा विशेष सन्मान करण्यासाठी देखील हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

यानिमित्ताने तळागाळातील धनगर समाजाला भेडसावणाऱ्या काही प्रश्नांवर चर्चा होणार असून त्यावर मुख्यमंत्र्यांच्या मदतीने तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या मेळाव्यात धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नासहित इतर प्रश्न देखील मांडले जातील असे या कार्यक्रमाचे आयोजक योगश जानकर यांनी स्पष्ट केले आहे.

देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याचा आनंद साजरा करत असताना धनगर समाजाचे मूलभूत प्रश्न आजही प्रलंबित आहेत. रस्त्यावर मेंढ्या घेऊन चालणारे मेंढपाळ बांधव असोत किंवा कोकणातील धनगर पाड्यावर राहणारे गरीब धनगर बांधव असोत, त्यांचे अनेक प्रश्न आजही कायम आहेत. या प्रश्नांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साक्षीने चर्चा व्हावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक योगेश जानकर यांचे सांगणे आहे.

धनगर समाजातील पारंपरिक गजीढोल पथकांची उपस्थिती

वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात पार पडणाऱ्या या धनगर मेळावा आणि सन्मान सोहळ्यासाठी धनगर समाजाची ओळख असलेली राज्यभरतील सर्व प्रमुख गजीढोल पथकेही (Gaji Dhol pathak) हजेरी लावणार आहेत. पारंपरिक वाद्य आणि नृत्याच्या साथीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमातुन धनगर समाजाच्या एकजुटीचा भंडारा उधळून त्यांच्या सामाजिक प्रश्नांनाही हात घालण्यात येणार आहे.