‘शासन आपल्या दारी’ म्हणून गवगवा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या दारात मात्र आरोग्य सुविधांचा अभाव – पाटील

Thane – ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गेल्या १२ तासांत म्हणजेच शनिवार रात्रीपासून ते रविवार सकाळपर्यंत १७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसह ठाकरे गट आणि मनसेचे नेते आक्रमक झाले आहेत.

यावर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (State President of NCP Jayant Patil) यांची देखील प्रतिक्रिया आली आहे. ते म्हणाले, ठाणे महानगरपालिका क्षेत्राच्या अंतर्गत येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये रात्रभरात तब्बल १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुःखद आहे. ‘शासन आपल्या दारी’ म्हणून गवगवा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या दारात मात्र आरोग्य सुविधांचा अभाव आहे.

हॉस्पिटलमध्ये पुरेशा आरोग्याच्या सुविधा नाहीत, डॉक्टर्स नाहीत, स्टाफ नाही त्यामुळे रुग्णांवर उपचार करण्यासाठी सहाजिकच मर्यादा येतात. त्याचा त्रास सर्वसामान्य लोकांना सहन करावा लागतोय. लोकांचे नाहक जीव जात आहेत. शासनाने यात गांभीर्याने लक्ष घालावे.अशी मागणी पाटील यांनी केली आहे.