2024 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे – आंबेडकर 

 Pune – वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आगामी निवडणुकीवर भाष्य केलं आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय भवितव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 2024 मध्ये सरकार कुणाचं येईल हे आता सांगता येत नाही. पण 2024 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत. हे नक्की सांगतो. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत.

नरेंद्र मोदी यांच्या लोकसभेतील भाषणावर बोलताना आंबेडकरांनी टीका केली. भाषणात नरेंद्र मोदींचा कॉन्फिडन्स लूज दिसला. त्यांनी ओढून तोडून ते भाषण केलं, असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत.

भाजपला टक्कर देण्यासाठी विरोधी पक्षांनी मोट बांधली आहे. विरोधकांच्या INDIA आघाडीवरही प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस, बीआरएस हे पक्ष वेगळे राहतील. जगनमोहन रेड्डी हेही वेगळेच राहतील, असं वाटतं. हे नेते त्यांच्या राज्यात स्ट्राँग नेते आहेत. देशातील अनेक नेते आपल्या आपल्या भागातून पुढे येत आहेत. हे सगळे आपली आपली भुमिका मांडतील, असंही आंबेडकर म्हणालेत.