प्रशांत जगताप यांना गांभीर्याने घेत नाही; जगदीश मुळीक यांनी उडवली राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांची खिल्ली

पुणे- आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा चांगलाच गाजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मोदींच्या दौऱ्यापूर्वी भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगू लागला असून भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यावर जोरदार टीका करत खिल्ली उडवली आहे.

मुळीक म्हणाले, जगताप घोषणांना किंमत देत नसून, त्यांना गांभीर्याने घेत नाही. त्यांची बाहेर एक आणि महापालिकेत दुसरे अशी भूमिका असते. त्यांच्याच पक्षाचे नगरसेवक त्यांचेच आदेश पाळत नाहीत. हे वारंवार सिद्ध झाले आहे. शहरातील सिग्नल यंत्रणांचे सुसूत्रीकरण, महापालिकेचे कोरोना काळातील कॉफी टेबल बुक, शहरात उभी राहत असणारी रुग्णालये यांच्या बाबतीत त्यांनी आंदोलने केली. परंतु त्यांच्या महापालिकेतील सर्वच सभासदांनी या ठरावांना एकमुखी पाठींबा देत जगताप यांना तोंडघशी पाडले.

महापालिकेत एकशे बावीस नगरसेवक निवडून येतील या जगताप यांच्या विधानाची उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांनी खिल्ली उडविली. आता मोदींच्या विरोधात निदर्शने करण्याची जगताप यांची भाषा अशीच वल्गना करणारी आहे. कारण अजितदादा पवार यांनी मी पंतप्रधान नरेंद्र मोंदींच्या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचे विधान करून जगताप यांना पुन्हा उघड्यावर पाडले आहे. आम्ही त्यांना गांभीर्याने घेत नाही असं मुळीक यांनी म्हटले आहे.

पुढे बोलताना त्यांनी कॉंग्रेसला देखील फैलावर घेतले. ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी कॉंग्रेसने सत्तेचा आणि पोलिसी बळाचा गैरवापर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यात निदर्शने करण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही जशास तसे उत्तर देऊ. देशात महाराष्ट्र कॉंग्रेसमुळे कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान शंभर टक्के सत्य आहे. त्यामुळे कोरोना देशभर वेगाने फैलावला. हे सत्य पचविण्याची ताकद कॉंग्रेस पक्षाच्या नेतृत्वात नाही. त्यामुळेच अस्तित्व टिकविण्यासाठी नैराश्याच्या भावनेतून कॉंग्रेस टीका करीत आहे.