‘पुन्हा एकदा मराठीच्या नावानं, जुन्याच पाट्या नव्याने टाकण्याची वेळ आली’

मुंबई : राज्यातील सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेमध्ये असावेत असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून या संदर्भात महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, 2017 मध्ये सुधारणा करण्यात येईल.

कामगार संख्या 10 पेक्षा कमी असलेल्या आस्थापना तसेच 10 पेक्षा अधिक असलेल्या आस्थापना, अशा सर्व आस्थापना, देवनागरी लिपीत मराठी भाषेमध्ये नामफलक प्रदर्शित करतील. मालक आस्थापनेचा नामफलक हा मराठी देवनागरी लिपी बरोबरच इतर भाषेतही लिहू शकतो.

ठाकरे सरकारच्या या निर्णयानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पात्र काढून या निर्णयाचे खरे श्रेय हे महाराष्ट्र सैनिकांचे असल्याचे ठासून सांगितले आहे. तर महाराष्ट्र फक्त फक्त मराठीच चालणार याची आठवण आम्हाला पुन्हा पुन्हा करायला लावू नका. असा थेट इशाराच राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीला दिला आहे.

तर दुसरीकडे माजी कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी देखील या निर्णयावर प्रतिक्रिया दित शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ‘महाराष्ट्रात सर्व दुकानाच्या पाट्या मराठीत कराव्या लागणार – राज्य सरकारचा निर्णय. आली रे आली मुंबई महानगरपालिका निवडणुक आली. पुन्हा एकदा मराठीच्या नावानं, जुन्याच पाट्या नव्याने टाकण्याची वेळ आली! मराठी जनता मराठमोळी आहे मराठभोळी नाहीच!’ असा टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे.