विरोधी पक्ष आणि जनहिताच्या रेट्यामुळे निर्बंध उठवले – आशिष शेलार

मुंबई- हिंदू नववर्षा निमित्ताने गुढीपाडव्याला निघणाऱ्या स्वागतयात्रा आणि रामनवमीच्या मिरवणुकींंना होऊ नये अशी रचना सरकारची होती पण जनतेचा रेटा वाढला, विरोधी पक्षांचा रेटा वाढला म्हणून अखेर निर्बंध उठवण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार (Adv. Ashish Shelar) यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, विधानसभा सुरु असताना मी स्वत: याबाबत सभागृहात मागणी केली. त्यावेळी जाहीर केले नाही. त्यानंतर जनतेचा रेटा जेव्हा वाढू लागला तेव्हा रोष अंगावर येऊ नये म्हणून ठाकरे सरकारने आज निर्णय घेतला. यासाठी एवढा उशिर का झाला? यापूर्वीच्या मंत्री मंडळाच्या बैठकीत हा निर्णय का घेतला नाही? गुढीपाडवा दोन दिवसावर आला असताना निर्णय का घेतला? याची परवानगी दिल्लीतून कुठल्या पक्ष कार्यालयातून येणार होती का? या सगळ्याचा विचार केला तर लक्षात येईल की, हा निर्णय स्वखुशीने घेतलेला नाही. तर तो जनतेचा आणि विरोधी पक्षांचा रेटा वाढला म्हणून आज निर्णय घेण्यात आला.

हिंदू नव वर्षे स्वागतयात्रा होऊ नये असेच प्रयत्न केले जात होते. मुंबईवर दहशतवादी हल्ले ड्रोनच्या माध्यमातून होणार अशी भिती घालून जमावबंदी लावण्यात आली होती. जर अशी पोलिसांकडे असेल तर सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यास कोणताही विरोध असण्याची कारण नाही. पण हिंदू सणांवर निर्बंध घालण्याचे षडयंत्र होते. आम्ही उघड केले त्यामुळे जनतेचा रेटा वाढला म्हणून निर्बंध उठवावे लागले, असेही आमदार आशिष शेलार यांनी म्हटले आहे. मास्क बंदी उठवली तर तो निर्णय वैद्यकीय अभ्यास गटाच्या सुचनेनुसार होणे अपेक्षित आहे. या मास्क बंदी च्या नावाने नाक्या नाक्यावर जी बेहिशेबी वसूली सुरु होती त्याचे काय? असा सवालही त्यांनी केला.