‘भाजपने संभाव्य विजयी उमेदवारांना पळवण्याचा प्रयत्न केल्यास कॉंग्रेस व जनता गप्प बसणार नाही’

पणजी: भाजपच्या राजवटीत पक्षांतरामुळे गोवा आणि गोव्याच्या अर्थव्यवस्थेला फटका बसल्याचे निदर्शनास आणून देत, गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे  अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी शनिवारी सांगितले की, राज्यातील जनता अशी कृत्ये पुन्हा खपवून घेणार नाही आणि इतिहासाची पुनरावृत्ती झाल्यास भाजप नेत्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

चोडणकर यांनी शनिवारी पणजी येथे पत्रकार परिषद संबोधित करताना सांगितले की, मुख्यमंत्रिपदाकडे डोळे लावून बसलेले भाजपचे नेते इतर पक्षांतील संभाव्य विजयी उमेदवारांना आपल्या बाजुने नेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यावेळी काँग्रेस नेते अमरनाथ पणजीकर उपस्थित होते.

प्रमोद सावंत, विश्वजित राणे आणि मॉविन गुदिन्हो हे भाजपचे सरकार स्थापन करण्यासाठी संभाव्य विजयी उमेदवारांना आपल्या बाजुने नेण्यासाठी प्रयत्नशील आहेत, असे ते म्हणाले. हे नेते मुख्यमंत्री होण्याच्या रिंगणात राहण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांची ही कृत्ये  लोक  खपवून घेणार नाहीत. पक्षांतर करण्यासाठी उमेदवारांना करोडो रुपयांची ऑफर दिली जाते. गोवावासीय हे होऊ देणार नाहीत आणि पक्षांतराला प्रोत्साहन देणाऱ्यांना धडा शिकवतील.” असे ते
म्हणाले.

ते म्हणाले की, भाजपने सत्तेत राहण्यासाठी पक्षांतराला प्रोत्साहन दिले आणि यासाठी राज्याचे नुकसान झाले आहे. आतापर्यंत भाजपला कळून चुकले आहे की त्यांना बहुमत मिळणार नाही आणि त्यामुळे मुख्यमंत्री होण्याची आकांक्षा असलेले त्यांचे नेते संभाव्य  विजयी उमेदवारांना पळवण्याचा प्रयत्न करत आहेत. नवी काँग्रेस एकजूट आहे आणि त्यामुळे गोव्याची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करणाऱ्या भाजपच्या डावपेचांना आमचे सदस्य बळी पडणार नाहीत.असे ते म्हणाले.

आमचे संभाव्य विजयी उमेदवार,  ज्यांना या ऑफर्स देण्यात आल्या, ते यापुढे भाजपचा पर्दाफाश करतील. भाजपने आपली कृत्ये बंद करावी. यावेळी आम्ही गप्प बसणार नाही, तर भाजपला लोकांच्या रोषाचा सामना करावा लागणार आहे. असे ते  म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या राजवटीची प्रशंसा करताना चोडणकर म्हणाले की, ते धर्मनिरपेक्ष राजा होते. “ त्यांनी सर्वांना न्याय दिला. गोव्यातील राजकारण्यांनी त्यांच्या तत्त्वांचे पालन करून गोव्यातील लोकांना सोबत घेऊन जाण्याची गरज आहे. असे चोडणकर म्हणाले.