मोदीजी आता तुम्हीच तुमच्या मित्राला समजावा, युक्रेनची मोदींना गळ !

नवी दिल्ली : युक्रेन प्रश्नावर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची बैठक सुरू असतानाच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पूर्व युक्रेनमध्ये लष्करी कारवाई करण्याची घोषणा केली आहे. युक्रेनमधून येत असलेल्या धमक्यांना हे उत्तर असल्याचं पुतीन यांनी म्हटलं आहे. युक्रेनवर ताबा मिळवण्याचा रशियाचा उद्देश नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, पुतिन यांनी युक्रेनमधील रशियन कारवायांमध्ये हस्तक्षेप करणार्यांचा बदला घेण्याची शपथ घेतली आहे. पुतीन यांनी युक्रेनच्या लष्कराला ‘शस्त्रे खाली’ ठेवण्याचे आवाहनही केले आहे.

पुतिन यांनी अमेरिकेसह युरोपीय देशांना इशारा देत, रशियाच्या कारवाईमध्ये हस्तक्षेप करण्याचा कोणीही प्रयत्न केला तर त्यांनी कधीही पाहिलेले नाही असे परिणाम घडतील असे म्हटले आहे. युक्रेनला नाटोमध्ये सामील होण्यापासून रोखण्यासाठी आणि मॉस्को सुरक्षा हमी देण्याच्या रशियाच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांवर केला. असे असतानाही युक्रेनच्या दूताने थेट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मध्यस्थीची मागणी केली आहे.

युक्रेनचे भारतातील दूत इगोर पोलिखा यांनी आता थेट रशियासोबतच्या संघर्षात भारताच्या मध्यस्थीची मागणी केली आहे. मोदी आणि व्लादिमीर पुतिन यांचे संबंध चांगले असल्याचा दाखला त्यांनी दिला आहे. ते म्हणाले की, मोदी हे जगातील सामर्थ्यवान आणि सन्माननीय नेते आहेत. भारताचे रशियासोबत अतिशय चांगले सामरिक संबंध आहेत. मोदींजींनी पुतीन यांच्याशी संवाद साधल्यास ते नक्कीच प्रतिसाद देतील, अशी अशा आम्हाला आहे. केवळ युक्रेनच्या नागरिकांसाठी नव्हे तर तेथे अडकलेल्या भारतीय नागरिकांसाठी भारताचा हस्तक्षेप महत्वाचा आहे. आम्हाला केवळ राजशिष्टाचाराचे निवेदन नको. आम्हाला सगळ्या जगाकडून पाठिंबा हवा आहे. असं ते म्हणाले.