संजय राऊत प्रचारासाठी उत्तर प्रदेशात, इकडे ईडीने फास आवळला

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने नवाब मलिक यांना अटक केली आहे. त्यानंतर या अटकेच्या निषेधार्थ मुंबईत महाविकास आघाडीतील तीनही पक्ष मिळून धरणे आंदोलन करण्यात येत असून, सत्तेतील तीन पक्षांची एकजूट दाखवण्यात येत आहे.

दुसरीकडे नवाब मलिक यांच्यानंतर आता संजय राऊत यांचे निकटवर्तीय ईडीच्या रडारवर आले आहेत. उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मैदानात शिवसेनेने(Shivsena) कंबर कसली आहे. उत्तर प्रदेशात शिवसेनेचे ३७ उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांसाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे नेते-खासदार संजय राऊत, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे प्रचारासाठी उत्तरप्रदेश मोहिमेवर गेले आहेत.

मात्र ही मोहिम सुरु असतानाच ईडीने महाराषट्रात संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांच्या घरावर छापे टाकले आहेत. त्यामुळे ईडीने आता कारवाईचा फास संजय राऊतांभोवती आवळला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ईडीच्या दिल्लीतील टीमने आज दुपारी संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेले प्रविण राऊत यांच्याशी संबंधित २ जणांवर छापेमारी केलेली आहे. प्रविण राऊत यांच्या १ हजार कोटींच्या बेनामी संपत्ती संदर्भात दिल्ली ईडीच्या २० अधिकाऱ्यांच्या टीमकडून ठाणे, रायगड भागांमध्ये छापेमारी करण्यात आली.