प्रेमाचे भवितव्य ठरणार क्रिकेटचा सामना; ‘फ्रि हिट दणका’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

पुणे – क्रिकेट म्हणजे भारतीयांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय. क्रिकेटवर आधारित चित्रपटांनी प्रेक्षकांना नेहमीच आकर्षित केले आहे. अशा या क्रिकेटवर आधारित ‘फ्रि हिट दणका’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.या चित्रपटाचा विषय क्रिकेटभोवती फिरणारा असला तरी, या क्रिकेटचा खेळच यातील नायक-नायिकेच्या प्रेमाचे भवितव्य ठरवणार आहे.

या चित्रपटाची कथा प्रेम आणि खेळाला एका वेगळ्याच वळणावर नेऊन ठेवणारी आहे. एसजीएम फिल्म्स प्रस्तुत ‘फ्रि हिट दणका’ या चित्रपटाच्या पोस्टरपासूनच या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. टिझर प्रदर्शित झाल्यावर ही उत्सुकता अधिकच शिगेला पोहोचली आणि अखेर ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. ग्रामीण प्रेमकथा, क्रिकेट, उत्तम संवाद, जबरदस्त अभिनय या सगळ्यांमुळे चित्रपटाचा ट्रेलर प्रचंड गाजला. ट्रेलर पाहून आता प्रेक्षक चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

उघडेवाडी आणि निगडेवाडी या दोन गावातील पाटील घराण्यांमध्ये वैमनस्य असून धुमाकुळ पाटीलाच्या मुलाचे अण्णा पाटीलांच्या मुलीवर प्रेम जडते. मात्र दोघांच्या वडिलांमध्ये वैर असल्याने त्यांचा या प्रेमाला विरोध आहे. त्यामुळे आता या दोघांच्या प्रेमाचा निर्णय गावांमध्ये दरवर्षी भरवल्या जाणाऱ्या क्रिकेटच्या स्पर्धेवर अवलंबून असून त्यांचा प्रेम यशस्वी होते की या क्रिकेट सामन्यामुळे त्यांना आणखी अडचणींचा सामना करावा लागतो, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला १७ डिसेंबरला सिनेमागृहात मिळणार आहेत. चित्रपटाच्या गाण्यांनी यापूर्वीच प्रेक्षकांना वेड लावले आहे ‘रंग पिरतीचा बावरा’ आणि ‘दांडी गुल’ ही दोन जबरदस्त गाणी प्रदर्शित झाली असून ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत.

सुनील मगरे दिग्दर्शित ‘फ्रि हिट दणका’ या चित्रपटात ‘फँड्री’ फेम सोमनाथ अवघडे आणि अपूर्वा एस. यांच्या प्रमुख भूमिका असून ‘सैराट’ चित्रपटातील सुपरहिट जोडी अरबाज (सल्या) आणि तानाजी (लंगड्या), सुरेश विश्वकर्मा, अनिल नगरकर, गणेश देशमुख यांच्याही महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. आकाश अलका बापू ठोंबरे, मेघनाथ गुरुनाथ सोरखडे आणि सुनिल मगरे निर्मित या चित्रपटाचे सहनिर्माते नितीन बापू खरात, सुधाकर लोखंडे आहेत. या चित्रपटाचे लेखन आणि संवाद संजय नवगीरे यांचे असून बबन अडगळे आणि अशोक कांबळे यांचे संगीत लाभले आहे. तर या चित्रपटाची कथा आणि पटकथा सुनील मगरे यांची आहे.