उद्धव ठाकरे पंतप्रधान झाले तर मी मुख्यमंत्री होऊ शकतो – गुलाबराव पाटील

जळगाव – उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे जर पंतप्रधान झाले तर आपण मुख्यमंत्री होऊ शकतो असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आपल्या वाढदिवशी केलेल्या भाषणादरम्यान  केलं आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या भाषणापूर्वी आमदार किशोर पाटील यांनी कॅबिनेट मंत्री पदानंतर गुलाबराव पाटील यांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळेल, असं म्हटलं. यावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, किशोर पाटील (Kishor Patil) म्हणाले की मला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळावी. आता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. ते पंतप्रधान झाले तर मला मुख्यमंत्री होता येईल, असं ते म्हणाले.

मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या पाळधी या गावात सभा पार पडली. गुलाबराव पाटील म्हणाले की, हा गुलाबराव पाटील मंत्री होणे शक्यच नव्हते. जनतेच्या आशिर्वाद प्रेमामुळे ते होऊ शकलं. मी राजकारणात आलो नसतो तर किर्तनकार झालो असतो, असंही ते म्हणाले.

त्यांनी म्हटलं की, आता मंत्री असल्याने विरोधकांना पाहिजे त्या शब्दात उत्तर देता येत नाही, मात्र कीर्तनकार असतो तर इंदुरीकर महाराजांच्या (Indurikar Maharaj) सोबतच राहिलो असतो. अर्ध्या कीर्तनकारांची दुकानं बंद करून टाकली असती, असंही ते म्हणाले. नाटकातही काम केलं असल्याची आठवण करून देत त्या नाटकातून निघालो राजकारणाच्या नाटकात आलो असल्याचेही, मंत्री गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.