अर्थसंकल्पातील घोषणांवरून धनंजय मुंडे यांची तुफान फटकेबाजी;तुकोबांचे अभंग ते शायरीतून काढले चिमटे

शिवस्मारकाची एक वीटही दिसत नाही!; स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंचा भाजपला विसर पडणे दुर्दैवी

मुंबई  – राज्याच्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सरकारला स्वतःच केलेल्या घोषणांचा विसर पडला आहे. विसराळू सरकारने मागील काही निवडणुकांमध्ये मिळालेले सततचे पराभव पाहता सवंग लोकप्रियता मिळवण्याच्या दृष्टीने केवळ ऐकायला गोड वाटतील अशा घोषणा केल्या आहेत, मात्र त्या प्रत्यक्षात पूर्ण करण्याची क्षमता या सरकारची आहे का, असा सवाल माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांनी अर्थसंकल्पावरील चर्चे दरम्यान बोलताना उपस्थित केला.

मागील काळात सरकार पक्षातील लोक सत्तेत असताना स्वतःच केलेल्या घोषणा ते पूर्ण करू शकले नाही, इतकेच काय तर त्या घोषणांचा सरकारला आता विसर पडला आहे. शेतकरी कष्टकरी वर्गाला खुश करण्यासाठी वार्षिक ६ हजार रुपये देण्याची नमो शेतकरी महासन्मान योजना घोषित केली, मात्र शेती मालाच्या भावाच्या बाबतीत काहीही ठोस उपाययोजना केली नाही. भावांतर योजना अपेक्षित असताना त्याबद्दलचाही निर्णय सरकारला घेता आला नाही. यावर बोलताना धनंजय मुंडे यांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा संदर्भ दिला. संत तुकारामांच्या ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी’ या अभंगाच्या माध्यमातून शेतकरी कष्टकरी लोक सरकारने थोडीफार जरी मदत केली तरी डोक्यावर घेतील मात्र त्यांना दिलेली आश्वासने फोल ठरली तर हेच शेतकरी अभंगवाणी खरी करतील असा इशाराही धनंजय मुंडे यांनी सरकारला दिला.

धनंजय मुंडे यांनी अर्थसंकल्पात पंचामृत नावाने केलेल्या घोषणांवरून चांगलीच फटकेबाजी केली. मागील वर्षी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मांडलेल्या पंचसूत्री अर्थसंकल्पाची यावर्षीचा अर्थसंकल्प ही ‘कॉपी, एडिट व पेस्ट’ नक्कल आहे, अशी मिश्किल टिप्पणीही धनंजय मुंडे यांनी केली.

अर्थसंकल्पात अमरावती जिल्ह्यात मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली, मात्र अंबाजोगाई येथे मराठीचे आद्यकवी मुकुंदराज यांच्या माध्यमातून अंबाजोगाई हे मराठीचे मूळ उगम असल्याचे अनेक तज्ज्ञांचे मत आहे, त्यामुळे मराठी भाषा विद्यापीठ हे अंबाजोगाई येथेच व्हायला पाहिजे, अशी मागणीही धनंजय मुंडे यांनी केली.

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेत आलेल्या या सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रात भूमिपूजन केलेल्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचा विसर पडावा, काही दिवसांपूर्वी मोदीसाहेब मुंबईत विमानाने आले तेव्हा त्यांनी आकाशातून मुंबई कशी दिसते असा एक व्हिडिओ टाकला होता, त्यात ते शिवस्मारक स्थळाची एखादी वीट तर शोधत नव्हते ना, असा टोलाही धनंजय मुंडे यांनी लगावला.

राज्यातील सातत्याने दुष्काळ पडणाऱ्या १४ जिल्ह्यात गरीब शेतकरी-कष्टकरी वर्गाला मिळणारे स्वस्त धान्य बंद करून शासनाने प्रतिमहिना १५० रुपये देण्याची घोषणा केली. गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ आदी धान्याचे भाव पाहिले असता दीडशे रुपये महिन्यात धान्य घेऊन पोट भरा म्हणणे म्हणजे गरिबांचा अपमान आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया देखील धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.

दरवर्षी एक जानेवारी रोजी शौर्य दिनानिमित्त शौर्य स्तंभास अभिवादन करण्यासाठी लाखो भीम अनुयायी कोरेगाव भीमा येथे येतात. कोरेगाव भिमाच्या विकास आराखडा संदर्भात देखील या अर्थसंकल्पात उल्लेख करण्यात आलेला नाही, यावरूनही धनंजय मुंडे यांनी प्रश्न उपस्थित केला.

भाजपला ग्रामीण भागात, बहुजन समाजात नावारूपाला आणण्यात स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांचे सर्वात मोठे योगदान होते, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांचे छत्रपती संभाजी नगर येथे स्मारक उभारण्याची घोषणा भाजपने २०१४ साली सत्तेत आल्यानंतर केली होती, मात्र त्या स्मारकाची एक वीट देखील अद्याप लागली नाही याकडे लक्ष वेधले.

भाजपने घोषित केलेल्या स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळास महाविकास आघाडी सरकारच्या काळात आम्ही मूर्त स्वरूप दिले. मात्र सरकारने या महामंडळाचा अर्थसंकल्पात साधा उल्लेख सुद्धा केला नाही हे अत्यंत दुर्दैवी आहे अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली.

केवळ लोकप्रियतेच्या घोषणा करून चालणार नाही तर आर्थिक तूट व अन्य सर्व व्यवहार्य बाबींचा विचार करून केलेल्या घोषणा खऱ्या करून दाखवण्यासाठी या सरकारचा कस लागणार असल्याचेही धनंजय मुंडे म्हणाले. सुमारे ४० मिनिटांच्या आपल्या भाषणातून धनंजय मुंडे यांनी अभ्यासपूर्ण आकडेवारी मांडण्यासह अभंगवाणी व शायरीचा आधार घेत तुफान फटकेबाजी केली.