पुण्यातील बांगलादेशी घुसखोरांवर तातडीने कारवाई करावी – धीरज घाटे

पुणे : पुणे शहरात (Pune City) गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिक वास्तव्य करत असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. पुणे पोलिसांनी गेल्या आठवड्यात कोथरूड येथून दोन दहशतवादी पकडले आहेत. ह्या पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने आज पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात गेल्या काही दिवसात पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी घुसखोर अवैध रित्या पुण्यात वास्तव्यास असल्याचे पुणे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. हे घुसखोर पुणे शहराच्या विविध भागात वास्तव्य करत असल्याने पुणे पोलिसांनी तातडीने याबाबत कारवाई करून त्यांची पूर्ण माहिती घ्यावी. तसेच बेकायदेशीर रित्या पुण्यात राहत असलेल्या बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करावी, अशी मागणी शहराध्यक्ष धीरज घाटे (Dhiraj Ghate) यांनी केली.

पुढील काही दिवसात मोठ्या प्रमाणावर सणवार सुरू होत असल्याने शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही माहिती खूप धक्कादायक आहे. त्यामुळे ह्या बाबत तातडीने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या प्रसंगी शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या समवेत प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर,माजी आमदार योगेश टिळेकर , माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले,माजी नगरसेवक सुशील मेंगडे, दीपक पोटे, अजय खेडेकर ,राजेंद्र शिळीमकर आदी उपस्थित होते.