माझ्या मुलीला देशातली ही बातमी कुठल्या तोंडानं सांगू आम्ही? सोनाली कुलकर्णीची मन सुन्न करणारी पोस्ट

देशात घडणाऱ्या विविध घटनांवर कलाकार वेळोवेळी व्यक्त होत असतात. काही दिवसांपूर्वीच मणिपूर येथे हिंसक (Manipur Violence) जमावाने दोन महिलांची रस्त्यावरुन नग्न अवस्थेत धिंड काढली होती. या घटनेवर देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. आता मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) हिने या घटनेसंदर्भात अस्वस्थ करणारी पोस्ट केली असून ती घटना माझ्या लहान मुलीला कुठल्या तोंडाने सांगू असा प्रश्न तिने विचारला आहे.

माझी मुलगी ११ वर्षाची आहे.. तिला सध्या सुट्टी आहे.. सुट्टीत तिच्यासाठी बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आम्ही प्लॅन करत असतो.. त्यातली एक गंमत म्हणजे रोज वर्तमानपत्रातल्या ३-४ बातम्या तिने वाचायच्या.. कला, क्रीडा, समाज, राजकारण, विज्ञान, विश्व, माणसं.. ह्याबाबत कितीतरी गोष्टी तिच्या कानावर पडतात, तिला सांगण्याच्या निमित्ताने आमची माहिती, स्मृती ताजी होते.. किती मजेत जाते सकाळ.. पण गेल्या आठवड्यापासून माझा थरकाप उडाला आहे.., असे सोनालीने तिच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले.

पुढे ती लिहिते, मी आणि नचिकेत कावेरीपासून पेपर लपवतो आहोत.. एका लहान निरागस मुलीला आपल्या देशातली ही बातमी कुठल्या तोंडानं सांगू आम्ही..? की एका मोठ्या जमावाने दोन स्रियांना विवस्त्र करून हुल्लडबाजी करत, त्यांच्या शरिराला निंदनीय स्पर्श करत त्यांची धिंड काढली.. हा विकृत खेळ दिवसाढवळ्या झाला.. त्या असहाय्य स्त्रिया बचावासाठी पळत असताना कुठलाही समर्थ जबाबदार पुरूष त्यांना वाचवायला पुढे आला नाही..

स्त्रीवर परिस्थितीचा, इतिहासाचा सूड उगवू शकतो हे कोणी ठरवलं.. कोणी ठरवलं की स्त्री एक साधन आहे – तिचा आपण हवा तसा उपयोग करू शकतो.. तीव्र संताप येतोय तेचतेच लिहिण्याचा.. तो एक व्हिडिओ जेमतेम १० सेकंद पाहू शकले मी .. त्यात काहींनी त्या बायांना केलेले अक्षम्य क्रूर अश्लील स्पर्श दिसले.. त्यात त्या पुरूषांची जात दिसली – त्या जातीचं नाव होतं नराधम !, अशा शब्दांत सोनालीने त्या घटनेचा निषेध केला.

साधा चुकून पाय लागला कोणाला तर चटकन नमस्कार करतो आपण.. परस्त्रीला मातेसमान मानतो आपण.. भारतीय संस्कार किती महान असतात म्हणतो आपण.. मग..? हे आहेत आपले संस्कार..? अब्रूचे धिंडवडे काढायला शिकवणारे..? बलात्कार झाल्यानंतर हौतात्म्य आणि सहानुभूती देणाऱे..? आपल्या देशाच्या राष्ट्रपती एक महिला आहेत, मंगळावर यान पाठवणाऱ्या टीममधे प्रामुख्यानं महिला शास्त्रज्ञ आहेत- ह्यासाठी अभिमान वाटून घेत असताना हे काय घडून बसलं.. सरकार, पोलीस, पत्रकार, समाजसेवक, न्यायव्यवस्था त्यांचं कर्तव्य करतीलंच.. आशा तरी ठेवूया.. गरज आहे ही मानसिकता बदलण्याची.. हे पुरूष बदलण्याची ! अशा गुन्ह्याला जबरदस्त दहशतीची शिक्षा सुनावण्याची – अशी सजा – जी ऐकून त्या झुंडीच नाही , तर कुणाच्याच पुढच्या सात पिढ्या मनातही पाप करू धजल्या नाही पाहिजेत..

रडू येऊ नये म्हणून दात घट्ट मिटून ठेवले तरी डोळ्यातून घळघळ पाणी येतंय. जीव घाबरा होतोय.. रस्त्यावरच्या प्रत्येक मुलीबाळीला सुरक्षित घरी पोचवावंसं वाटतंय.. जळी स्थळी काष्ठी पाषाणी, निर्वस्त्र देह कसाबसा हातांनी झाकून – धरणीमाते पोटात घे – असा मूक आक्रोशाचा भाव असलेल्या त्या दोघी मला पळताना दिसत आहेत.. कुठलं जनावरही असं पाशवी होताना ऐकलं नाहीए आपण..

मी माझ्या मुलीला जगाबद्दल काय चांगलं सांगू.. कोणालाच, कधीच अशा बातम्या वाचायला लागू नयेत.. पुष्यमित्र उपाध्यायांची कविताच अंगी बाणावी लागणार आता प्रत्येकीला.. सुनो द्रौपदी शस्त्र उठा लो.. अब गोविंद ना आयेंगे.., अशी भलीमोठी पोस्ट सोनालीने लिहिली आहे.