जेमिमाह रॉड्रिग्सचे तुफानी अर्धशतक! विश्वचषकात भारताने पाकिस्तानच्या ठेचल्या नांग्या, सात विकेट्सने मिळवला विजय

India vs Pakistan Women’s T20 World Cup 2023: महिला T20 विश्वचषक 2023 मधील पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 150 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात भारताने 19 षटकांत 3 गडी गमावून लक्ष्य गाठले. जेमिमाह रॉड्रिग्जने टीम इंडियासाठी चमकदार कामगिरी केली. तिने नाबाद अर्धशतक झळकावले. रिचा घोष आणि राधा यादव यांनीही महत्त्वाचे योगदान दिले.

प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 20 षटकांत 4 गडी गमावून 149 धावा केल्या. कर्णधार बिस्माह मारूफने चमकदार कामगिरी केली. तिने 55 चेंडूंचा सामना करत नाबाद 68 धावा केल्या. बिस्माहच्या या खेळीत 7 चौकारांचा समावेश होता. याशिवाय आयशा नसीमनेही तुफानी खेळी खेळली. तिने 25 चेंडूंचा सामना करत नाबाद 43 धावा केल्या. या खेळीत तिने 2 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. सलामीवीर मुनीबा अली 12 धावा करून बाद झाली. जवेरिया खानने 8 धावांचे योगदान दिले. भारताकडून राधा यादवने 2 बळी घेतले. त्याने 4 षटकात 21 धावा दिल्या. पूजा वस्त्राकरने 4 षटकात 30 धावा देत 1 बळी घेतला. दीप्ती शर्माने 4 षटकात 39 धावा देत एक विकेट घेतली.

पाकिस्तानने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून युस्तिका भाटिया आणि शेफाली वर्मा सलामीला आल्या. शेफालीने 25 चेंडूत 33 धावा केल्या. तिने 4 चौकारही मारले. युस्तिकाने 2 चौकारांच्या मदतीने 17 धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौरने 12 चेंडूत 16 धावा केल्या. तिच्या या खेळीत 2 चौकारांचा समावेश होता. यानंतर जेमिमाह ने शानदार कामगिरी करत नाबाद अर्धशतक झळकावले. तिने 38 चेंडूंचा सामना करत 53 धावा केल्या. जेमिमाहच्या खेळीत 8 चौकारांचा समावेश होता. रिचा घोषाने 20 चेंडूत नाबाद 31 धावा केल्या. त्याने 5 चौकार मारले. अशा प्रकारे भारताने 19 षटकांत लक्ष्य गाठले.