भारत देश विकासाच्या दिशेने जलद गतीने वाटचाल करत आहे – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

पुणे  : आर्थिक क्षेत्रात भारत देश प्रगती करत आहे. आज देश जगातील पाचवी अर्थव्यवस्था बनला आहे. त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्राच्या विकासाठी रस्ते, विमानतळ यांसारख्या पायाभूत सुविधांची निर्मिती सुरु आहे. भारत देश जलद गतीने विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे, असे मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.

तसेच देशात उद्योजकतेसाठी चांगले वातावरण निर्माण झाले असून, विकासाच्या दिशेने वाटचाल करताना उद्योजकतेच्या अनेक संधी निर्माण होत आहेत, नागरिकांनी या संधीचा लाभ घेत, देशाच्या आर्थिक विकासात आपले योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.(India is moving fast towards development – Governor Bhagat Singh Koshyari)

डेक्कन चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चर (डीसीसीआयए) तर्फे आयोजित वार्षिक पुरस्कार सोहळ्यात राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. विमाननगर येथील हयात रिजेन्सी हॉटेल येथे संपन्न झालेल्या या सोहळ्याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रथिन सिन्हा, उपाध्यक्ष एच. पी. श्रीवास्तव, सचिव व्ही एल मालू, कोषाध्यक्ष सुनील गुप्ता आणि कार्यकारी समिती सदस्य मुकुल वार्शनी उपस्थित होते. वाहन उद्योग, अभियांत्रिकी, उत्पादन, औषधनिर्मिती, एफएमसीजी, रसायन, इलेक्ट्रॉनिक्स, हेवी मटेरीअल्स, सुविधा क्षेत्र अशा विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच रोटरी क्लब ऑफ पूना डाउनटाउन’चे पदाधिकारी या सोहळ्यात सहभागी होते.

याप्रसंगी उद्योग आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल आयएमपी लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रकाश धोका यांना राज्यपालांच्या हस्ते ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गरजू लोकांसाठी काम करणाऱ्या दिवंगत सुरिंदर अगरवाल यांना समाजसेवेतील उल्लेखनीय कार्यासाठी जाहीर झालेला पुरस्कार त्यांच्या पत्नी प्रोमिल अगरवाल यांनी स्वीकारला. राज्याच्या उद्योग विभागाचे सह-संचालक सदाशिव सुरवसे यांना जनसेवेतील उल्लेखनीय कार्यासाठी सन्मानित करण्यात आले. बडवे इंजिनिअरिंग ग्रुप’चे श्रीकांत आणि सुप्रिया बडवे यांना ‘सर्वोत्तम उद्योजक’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर कीऑन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला ‘बेस्ट एच आर प्रॅक्टीसेस’ पुरस्कार, आयटीसी लिमिटेड या एफएमसीजी क्षेत्रातील कंपनीला ‘बेस्ट सेक्युरीटी प्रॅक्टीसेस’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रथिन सिन्हा आणि उपाध्यक्ष एच. पी. श्रीवास्तव यांनी संयुक्तपणे संस्थेचा आतापर्यंतचा प्रवास आणि संस्थेतर्फे राबविण्यात येणारे विविध उपक्रम तसेच कोविड काळात संस्थेतर्फे करण्यात आलेल्या मदतकार्याबाबत माहिती दिली.

सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा सन्मान करण्याच्या हेतूने २००२ साली या पुरस्काराची सुरवात करण्यात आली. या व्यक्तींचे कार्य समाजासमोर यावे, आणि त्यातून इतरांनाही चांगले कार्य करण्याची प्रेरणा मिळावी, हा या उपक्रमामागील मूळ हेतू आहे. औद्योगिक क्षेत्रातील कामगारांसाठी संस्थेच्या माध्यमातून आम्ही सातत्याने विविध उपक्रम राबवितो. आपल्या सदस्य कंपन्यांच्या विकासासाठी नुकतेच चेंबरने विविध नामांकित चेंबर ऑफ कॉमर्स आणि संस्थांसोबत तब्बल 8 नवीन सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली. विकासाच्या दिशेने एक पाऊल पुढे जात लवकरच आम्ही ‘महिला उद्योजक आणि स्टार्टअप्स’ साठी एक नवीन उपसमिती बनविण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.