काँग्रेस दहशतवादाच्या पाठीशी उभी आहे, मागच्या दाराने…; केरला स्टोरीवरून मोदींचा काँग्रेसवर निशाणा
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या (Karnataka Assembly Election 2023) प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) शुक्रवारी बेल्लारी येथे दाखल झाले. यावेळी पंतप्रधान मोदींनी ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) या चित्रपटाचा उल्लेख करत काँग्रेसवर (Congress) निशाणा साधला.
पीएम मोदी म्हणाले, दहशतवादी कटावर बनवलेल्या ‘केरळ स्टोरी’ या चित्रपटाची सध्या खूप चर्चा आहे. केरळची कहाणी केवळ एका राज्यातील दहशतवादी कारस्थानांवर आधारित असल्याचे सांगितले जाते. केरळ, देशाचे इतके सुंदर राज्य, जिथे लोक खूप मेहनती आणि प्रतिभावान आहेत, तिथे सुरू असलेला दहशतवादी कारस्थान या चित्रपटातून समोर आला आहे. पीएम मोदी म्हणाले, बॉम्ब, बंदुका आणि पिस्तुलांचे आवाज ऐकू येतात, पण समाजाला आतून पोकळ करण्याच्या दहशतवादी कारस्थानाचा आवाज येत नाही. न्यायालयानेही या दहशतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले, देशाचे दुर्दैव बघा की आज काँग्रेस समाजाला उद्ध्वस्त करण्याच्या या दहशतवादी प्रवृत्तीच्या पाठीशी उभी दिसत आहे. एवढेच नाही तर अशा दहशतवादी प्रवृत्ती असलेल्यांशी काँग्रेस मागच्या दाराने राजकीय सौदेबाजीही करत आहे. त्यामुळे कर्नाटकातील जनतेने काँग्रेसपासून सावध राहण्याची गरज आहे. हे लोक चित्रपटावर बंदी घालण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेसला असे करताना पाहून मला आश्चर्य वाटते.
कर्नाटकला देशातील नंबर-1 राज्य बनवण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्थेची सर्वात महत्त्वाची गरज असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. कर्नाटक दहशतवादापासून मुक्त राहणेही तितकेच महत्त्वाचे आहे. दहशतवादाविरोधात भाजप नेहमीच कठोर राहिला आहे. मात्र जेव्हा-जेव्हा दहशतवादाविरुद्ध कारवाई होते, तेव्हा काँग्रेसच्या पोटात दुखते, असा टोलाही त्यांनी शेवटी लगावला.