‘गौतमीच्या तीन गाण्यासाठी तीन लाख मोजण्याची तयारी पण आम्हाला टाळ वाजवूनही काही मिळत नाही’

बीड: ‘सबसे कातिल गौतमी पाटील’ (Gautami Patil), ‘गौतमीकी झलक सबसे अलग’….. सध्या लावणी म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा नाव समोर येतं ते म्हणजे गौतमी पाटीलचं. अश्लील डान्समुळे चर्चेत आलेल्या गौतमीच्या नृत्यानं संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलयं. गौतमीची क्रेझ इतकी आहे की आता मोठमोठ्या कलाकारांचे कार्यक्रम सोडून प्रेक्षक गौतमीचे कार्यक्रम पाहण्यास गर्दी करतात.

दरम्यान, काहीजण तिच्या बाजूने बोलतात तर तिचाअनेकांनी विरोध देखील केला. आता यात कीर्तनकार इंदुरीकर महाराजांची (Indurikar Maharaj) भर पडली आहे. इंदुरीकर महाराजांनी गौतमी पाटीलचा चांगलाच समाचार घेतला आहे. गौतमी पाटीलचं उदाहरण देत समाजाच्या बदलत्या मानसिकतेवर कीर्तनकार इंदुरीकर महाराजांनी टीका केली आहे.

गौतमीच्या तीन गाण्यासाठी तीन लाख मोजण्याची तयारी पण आम्हाला टाळ वाजवूनही काही मिळत नाही असं वक्तव्य इंदुरीकरांनी केलं आहे.आष्टी तालुक्यातील तवलवाडी येथे आज इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन ठेवण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

आम्ही पाच हजार मागितले तर पैशाचा बाजार मांडला असा आरोप होतो. मात्र गौतमीने तीन गाणे वाजविले की तीन लाख रुपये मोजतात. तिच्या कार्यक्रमात मारामारी, राडा तर तर काहींचे गुडघे फुटतात. आम्हाला मात्र टाळ वाजवून काहीही मिळत नाही. साधं संरक्षण देखील दिले जात नाही. असं इंदुरीकर महाराज यांनी कीर्तनात म्हटले आहे.