इन्फोसिसचे अध्यक्ष रवी कुमार एस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला

आयटी क्षेत्रातील प्रमुख इन्फोसिसचे (infosys) अध्यक्ष रवी कुमार एस ( president ravi kumar s) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कंपनीने मंगळवारी ही माहिती दिली. राजीनाम्यामागचे कारण कंपनीने स्पष्ट केलेले नाही. इन्फोसिसच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर होण्याच्या काही दिवस आधी कुमार यांनी राजीनामा दिला आहे. इन्फोसिसने स्टॉक एक्स्चेंजला पाठवलेल्या माहितीत म्हटले आहे की, रवी कुमार एस यांनी राजीनामा दिला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने त्यांच्या योगदानाचे कौतुक केले आहे.

भाभा अणुसंशोधन केंद्रात अणुशास्त्रज्ञ म्हणून कारकीर्द सुरू केल्यानंतर रवी कुमार 2002 मध्ये इन्फोसिसमध्ये रुजू झाले. 2016 मध्ये त्यांची कंपनीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. चेअरमन या नात्याने त्यांनी इन्फोसिसला जवळपास सर्वच उद्योग क्षेत्रात नेले होते. 2021-22 च्या अहवालानुसार, कुमार हे कंपनीचे तिसरे सर्वात जास्त वेतन घेणारे वरिष्ठ अधिकारी होते. सीईओ सलील पारिख आणि माजी सीओओ यूबी प्रवीण राव यांना कंपनीत त्यांच्यापेक्षा जास्त पगार मिळत होता. इन्फोसिस 13 तारखेला निकाल जाहीर करणार आहे. त्याच दिवशी बोर्ड शेअर बायबॅकचाही विचार करेल.