देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांप्रमाणे मीही अन्यायाविरोधात लढतोय; संजय राऊतांचं आईला भावनिक पत्र

मुंबई:- गोरेगाव येथील पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले शिवसेना नेता आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) चर्चेत आले आहेत. जामीन अर्जावरील सुनावणी वेळेअभावी त्यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. मात्र तुरुंगात असूनही संजय राऊत (Sanjay Raut Letter) यांची लेखणी थांबलेली नाही. संजय राऊत यांनी ८ ऑगस्टला सत्र न्यायालयात बसून आपल्या मातोश्रींसाठी एक पत्र लिहिले होते. हेच पत्र आता बुधवारी (१२ ऑक्टोबर) त्यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर ट्वीट केले आहे.

संजय राऊत यांनी आपल्या आईला पत्र लिहून म्हटले आहे की, आज राज्य षड्यंत्रकर्त्यांच्या हाती गेले आहे. त्यांना शिवसेनेचे अस्तित्व आणि महाराष्ट्राची शान चिरडायची आहे. तसेच त्यांनी आपल्या पत्रात त्यांना झालेली अटक आणि त्यावेळीच्या प्रसंगाची कहाणी कथन केली आहे. या कठीण काळातही त्यांची आई पाठिशी ठामपणे उभी होती. तसेच तिच्याकडूनच संघर्षाची शिकवण मिळाल्याचे संजय राऊतांनी पत्रात नमूद केले आहे.

संजय राऊत यांनी पत्रात म्हटलंय की, ‘शिवसेनेच्या म्हणजे महाराष्ट्राच्या शत्रूंपुढे झुकणार नाही. शिवसेनेचं आणि स्वाभिमानाचं बाळकडू तुझ्याकडूनच घेतलंय. शिवसेनेशी बेईमानी करायची नाही हे तुच शिकवलं आहे. बाळासाहेबांशी बेईमानी करायची नाही हे तुच मनावर कोरलं आहेस. कठीण काळात शिवसेनेला सोडलं, तर बाळासाहेबांना काय तोंड दाखवणार? देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांप्रमाणे मीही अन्यायाविरोधात लढतोय.’