आपण महाराष्ट्रात कधीच सत्तेवर पुन्हा येणार नाही या भीतीने भाजपने शिवसेना फोडण्याचे पाप केले – जयंत पाटील

शिवसेनेतील बंडाळी ही शिवसेनेची कधीच नव्हती ती भाजपप्रणीतच होती...

कोल्हापूर – हिंदूत्वाची मतं फुटतील आणि आपल्याला महाराष्ट्रात कधीच सत्तेवर येता येणार नाही या भीतीने भाजपला (BJP) ग्रासले असल्यामुळे शिवसेना (Shivsena) फोडण्याचे पाप भाजपने के,ले अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी कोल्हापूर येथे माध्यमांशी बोलताना आज केली. शिवसेनेतील बंडाळी ही शिवसेनेची कधीच नव्हती ती भाजपप्रणीतच होती, असा जोरदार हल्लाबोलही जयंत पाटील यांनी केला.

काही झालं तरी प्रोफेशनली आपल्याला टिकायचे तर समोरचा पक्ष फोडला पाहिजे, हा उद्देश ठेवून भाजपने शिवसेना फोडली; तसे कारस्थान रचण्यात आले. आता नावही आणि चिन्हही काढून घेण्यात आले, त्यामुळे उध्दव ठाकरे यांच्या घरातील शिवसेना चोरीला गेली आणि ती कुणाच्या घरात गेली हे थोड्या दिवसात समोर येईल. म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्याची व्यवस्था आयोगाच्या माध्यमातून होईल, यात शंका नाही असा थेट आरोपही जयंत पाटील यांनी केला आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंडाळीची कबुलीच दिल्यामुळे अर्थ स्पष्ट आहे की, शिवसेना फोडण्याचे आणि बाळासाहेबांच्या पक्षाचे दोन तुकडे करण्याचे कारस्थान भाजपने केले आहे असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.

आता बाळासाहेबांची शिवसेना हे नाव निवडणूक आयोग मान्य करतो. बाळासाहेब ठाकरे हे उध्दव ठाकरे यांचे वडील. उध्दव ठाकरे यांचा त्या नावावर पूर्ण अधिकार असे असताना निवडणूक आयोग निर्णय घेतो हे किती प्लॅनिंगने सुरु आहे आणि भयंकर आहे हे महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात येतेय त्यामुळेच राज्यातील जनतेचा भाजप आणि एकनाथ शिंदे सरकारवरील राग पदोपदी वाढतोय असेही जयंत पाटील म्हणाले.

शिवसेनेने ज्याला उमेदवारी दिली आहे त्याला साम-दाम-दंड भेद वापरायचा व त्याला पळवायचे हे योग्य आहे का? असा संतप्त सवालही जयंत पाटील यांनी यावेळी केला.

जो उमेदवार शिवसेनेने ठरवला आहे त्याचा प्रचार शिवसेनेने केला आहे. अंधेरी विधानसभा मतदारसंघात शंभर टक्के शिवसेना निवडून येईल अशी परिस्थिती आहे. यातून महाराष्ट्रातील जनमताची एक छोटीशी चाचणी मुंबईकरांची होणार आहे. अंधेरी मतदारसंघात मराठी भाषिक संख्या मर्यादित असून हा बहुभाषिक मतदारसंघ आहे त्यामुळे तिथला निर्णय कसा येतो आणि काय येतो हे बघण्याचे औत्सुक्य असतानाच उमेदवार पळवायचा हे जे लोक करत असतील तर राज्यातील जनतेच्या लक्षात येईल आणि पुढच्या विधानसभा निवडणुकीत यांच्याविरोधात कोण उभा राहणार नाही याची व्यवस्थाही ते करु शकतील असा उपरोधिक टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे.

शिवसेनेचा जो फुटीर गट आहे त्याचा पदोपदी महाराष्ट्रात निषेध व्हायला लागला आहे म्हणून मग कुणावर बोलायचं तर राष्ट्रवादीवर हा त्यांचा उद्देश आहे. राष्ट्रवादीने शिवसेना, कॉंग्रेस यांच्यासोबत पुढाकार घेऊन साथ दिली आणि पवारसाहेबांनी महाविकास आघाडीची स्थापना केली असेही जयंत पाटील यांनी ठणकावून सांगितले.