केंद्र सरकारच्या कामाचे आयते श्रेय घेण्यापेक्षा स्वतःच काहीतरी आणून दाखवा, पंकजा मुंडेंचा टोला

अंबाजोगाई : जिल्हयात नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायत निवडणूकीत भाजपला जे घवघवीत यश मिळालं आहे ते पुढील प्रत्येक निवडणूकीतील विजयाची नांदी ठरणारे आहे. ही विजयाची सुरवात आहे, आगामी प्रत्येक निवडणुकीत असेच यश दिसून येईल त्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागावे असं आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केलं आहे. केंद्र सरकारच्या कामाचे आयते श्रेय घेण्यापेक्षा स्वतःचं काहीतरी आणून दाखवा असा सणसणीत टोलाही त्यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांना लगावला.

बीड जिल्हयातील आष्टी, पाटोदा, शिरूर, वडवणी, येथील नगरपंचायत निवडणूकीतील भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार तसेच दीनदयाळ नागरी बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालकांचा सत्कार आज अंबाजोगाई येथे आ. नमिताताई मुंदडा यांच्या निवासस्थानी संपन्न झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. खा. डाॅ. प्रितमताई मुंडे, आ. सुरेश धस ,आ. नमिताताई मुंदडा, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, मोहनराव जगताप आदी यावेळी उपस्थित होते.

पुढे बोलतांना पंकजाताई म्हणाल्या, भाजपला नगरपंचायत निवडणूकीत चांगले यश मिळाले आहे, हे कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ आहे. या निकालाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि चैतन्य निर्माण झाला आहे. आज सर्वांचे फेटे पाहून आनंद होतोय. ही आपल्या विजयाची सुरवात आहे, आपण बेरजेचं राजकारण करतोयं त्यामुळे पुढील प्रत्येक निवडणूकीत असेच यश मिळेल, त्या जिंकण्यासाठी सर्व ताकद पणाला लावू, त्यासाठी आतापासूनच कामाला लागा. तुमच्या सर्वांच्या बळावर जिल्हयात पुन्हा विजयश्री खेचून आणू.

स्वतःच काहीतरी आणून दाखवा

राज्यात आज आम्ही विरोधी बाकावर आहोत, पण केंद्रात आपले सरकार आहे असं सांगून पंकजाताई यांनी जिल्हयातील सत्ताधाऱ्यांवर शरसंधान साधले. त्या म्हणाल्या, दोन अडीच वर्षे तुमच्या सर्व गोष्टी सहन केल्या. पण आता गप्प बसणार नाही. जनतेच्या हिताचं काम केलं तर तुमचा जाहीर सत्कार करू पण स्वतःच्या मुठभर कार्यकर्त्यांची पोटं भरण्यासाठी करणार असाल तर ते सहन केलं जाणार नाही. रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग ही केंद्राची कामं आहेत, तुम्ही पत्र दिली असतील, आम्ही पण राज्यात सीएम ला पत्र देतो, पण पाठपुरावा कुणी केलाय हे महत्वाचं असतं. जनता बोलते तेव्हा इतरांची तोंडं बंद होतात. कामं कुणी केलीत हे त्यांना माहित आहे. केंद्र सरकार मार्फत आम्ही प्रत्येक कामाचा पाठपुरावा केलेला आहे, ते जनता जाणून आहे त्यामुळे आमच्या कामाचं श्रेय घेण्यापेक्षा स्वतःच काहीतरी आणून दाखवा. जिल्हा आज कोणत्या वाटेवर गेलाय, आम्ही त्यासाठी तुम्हालाच प्रश्न विचारणार? नसेल तर मला अधिकार नाहीत हे एकदा जाहीर करून टाका असं पंकजा म्हणाल्या.