विजयाची घोडदौड अशीच निरंतर ठेवू – प्रितम मुंडे

आंबेजोगाई : नगर पंचायत निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात मिळलेले यश भाजपच्या विजयाचे प्रतीक आहे, विजयाची ही घोडदौड निरंतर सुरू ठेवून येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत ही यश मिळवू असा विश्वास खा.प्रितम मुंडे यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या निधीचे श्रेय लाटणारांना चांगलेच फटकारले. बीड जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून आम्ही मोठ्या प्रमाणात निधी आणला, त्याची कामे आजही सुरू आहेत. परंतु काही आमदारांनी केंद्राच्या निधीचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न चालवला आहे, केंद्र सरकारच्या निधीचे उदघाटन देखील आमदार करत आहेत. केंद्र सरकार आमदारांना कधीपासून निधी द्यायला लागले ? आम्ही केलेल्या पाठपुराव्यानंतर विरोधक पाठपुरावा केल्याचे पत्र टाकत असतात, आमच्या अगोदर पाठपुरावा केलेल्या तारखेतील पत्र दाखवा असे आव्हान ही त्यांनी श्रेयवाद्यांना दिले.

तर, जिल्हयात नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायत निवडणूकीत भाजपला जे घवघवीत यश मिळालं आहे ते पुढील प्रत्येक निवडणूकीतील विजयाची नांदी ठरणारे आहे. ही विजयाची सुरवात आहे, आगामी प्रत्येक निवडणुकीत असेच यश दिसून येईल त्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागावे असं आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केलं आहे. केंद्र सरकारच्या कामाचे आयते श्रेय घेण्यापेक्षा स्वतःचं काहीतरी आणून दाखवा असा सणसणीत टोलाही त्यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांना लगावला.

बीड जिल्हयातील आष्टी, पाटोदा, शिरूर, वडवणी, येथील नगरपंचायत निवडणूकीतील भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार तसेच दीनदयाळ नागरी बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालकांचा सत्कार आज अंबाजोगाई येथे आ. नमिताताई मुंदडा यांच्या निवासस्थानी संपन्न झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. खा. डाॅ. प्रितमताई मुंडे, आ. सुरेश धस ,आ. नमिताताई मुंदडा, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, मोहनराव जगताप आदी यावेळी उपस्थित होते.