गोवा विधानसभा निवडणूक : आम्ही एकोप्याने ‘स्ट्राँगर म्हापसा’चे ध्येय साध्य करु – जोशुआ पीटर डिसोझा

म्हापसा : राजकीय जीवनातील आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेताना म्हापसेकर माझ्या सोबत आहेत. त्यामुळे आत्मविश्वास वाटतो. आम्ही एकत्रितपणे ‘स्ट्राँगर म्हापसा’चे ध्येय साध्य करु, असा विश्वास आमदार जोशुआ पीटर डिसोझा यांनी व्यक्त केला.

म्हापसा विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार तथा विद्यमान आमदार जोशुआ डिसोझा यांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जोशुआ यांच्या मातोश्री व बहिण सोफिया डिसोझा उपस्थित होत्या. तसेच, महाराष्ट्र विधानसभा सभागृहाचे आमदार महेश लांडगे, राम सातपूते, गोवा भाजपाचे पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते यांनी अर्ज भरताना हजेरी लावली.

जोशुआ डिसोझा म्हणाले की, भाजपाकडून उमेदवारी अर्ज भरताना समाधान होत आहे. मला वडिलांचा आशीर्वाद आणि मापुसा मतदारसंघातील मतदारांचा पाठिंबा आहे. राज्य विधानसभा निवडणुकीसाठी सर्वपक्षीय उमेदवार निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून घरोघरी प्रचार करताना दिसत आहेत.

डोअर-टू-डोअर मोहिमेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. कोणीही आले आणि सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न केला तरी लोकांचा पाठिंबा माझ्या पाठीशी आहे आणि त्यामुळे माझा विजय निश्चित आहे, असा विश्वासही जोशुआ यांनी व्यक्त केला आहे.