तपास यंत्रणांना देशातील कोणत्याही व्यक्तींची चौकशी करण्याचा अधिकार – अजित पवार

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेनेची बाजू एकहाती लावून धरणारे खासदार संजय राऊत यांच्या घरावर ईडीने धाड टाकली आहे. गेल्या चार तासांपासून संजय राऊत (Sanjay Raut) यांची ईडीच्या अधिकाऱ्यांकडून कसून चौकशी सुरु आहे. सध्याच्या एकूण घडामोडी पाहता संजय राऊत यांना ईडीकडून (ED) अटकही केली जाऊ शकते. पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी ही कारवाई सुरु आहे.

या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्या टीकेमुळे दुखावले गेलेले भाजप आणि शिंदे गटाचे नेते आता त्यांच्यावर तुटून पडले आहेत. याच दरम्यान विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. या यंत्रणांना देशातील कोणाचीही चौकशी करण्याचा अधिकार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ही बातमी मला तुमच्याकडूनच समजली. मागच्या काळात ईडीच्या नोटीसा (ED Notice) आल्या आहेत. ज्या संस्था आहेत, त्यांना स्वायत्ता आणि चौकशीचे अधिकार देण्यात आले आहेत. असं ते म्हणाले.

वेगवेगळ्या विभागांमध्ये काही तक्रारी आल्या तर त्यांच्या प्रत्येक नागरिकाच्या बाबतीतले चौकशीचे अधिकार त्यांना आहेत. नक्की काय झालं आहे, त्यांच्याकडे पुन्हा पुन्हा का येत आहेत, याबाबत अधिक स्पष्टपणे राऊतच सांगू शकतील, अशी प्रतिक्रिया अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली. या यंत्रणांना देशातील कोणत्याही व्यक्तींची चौकशी करण्याचा अधिकार आहे, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.